मुंबई : ‘तुमची इयत्ता कंची’ असा सवाल तुम्हाला कुणी केला तर ? सुशिक्षित असूनही कधी कधी असा सवाल कुणी विचारला की संताप येतो. त्याचं कारण म्हणजे कधी काळी हा प्रश्न गुन्हेगारी जगतात विचारला जायचा. तो कोणते गुन्हे करतो त्यावरून त्याची इयत्ता ठरवली जायची. यात मवाली, गुंड, ठक, भामटा अशा चढत्या श्रेणी होत्या. यात मवाली, गुंड हे दमदाटी, हाणामारी, शस्त्रांचा धाक दाखवून लुटत असत. जिवाच्या भीतीने लोक घाबरून त्यांना अंगावरचे दाग, दागिने पैसे द्यायचे. हा अगदी प्राथमिक आणि शारीरिक पातळीवरचा प्रकार असल्याने अशा मवाली आणि गुंडांना यांना पहिल्या इयत्तेचे विद्यार्थी म्हणून गणले जात असे.
मवाली हा शब्द मूळचा अरबी आहे. अरबी नसलेल्या समुदायासाठी हा शब्द वापरला जात असे. अरबस्तानात इस्लाम आधी एक वर्ग गुलामाच्या स्थितीत रहात होता. इस्लामच्या समानतेच्या संदेशानुसार त्यांना धर्मांतर करण्याची संधी मिळाली. पण, त्यांना मूळ इस्लाम न म्हणता ‘मावळा’ असे नाव मिळाले. ज्याला संप्रदाय, धर्माचा नवीन संरक्षक, धार्मिक मित्र असे संबोधले गेले.
मोठ्या संख्येने बिगर अरबी समुदाय शतकानुशतके इस्लामच्या आश्रयाखाली येत राहिला. परंतु, अरबांच्या मुख्य प्रवाहात त्यांना इस्लामचे नवजात अर्थात मावळा म्हणून ओळखले गेले. दीक्षा असूनही, इस्लामिक उपासना पद्धतीचा अवलंब करण्याव्यतिरिक्त या लोकांच्या शिष्टाचार आणि देखाव्यामध्ये गैर-अरबवाद कायम राहिला. अरब समाजात त्यांना कनिष्ठ म्हणून पाहिले जात होते. ते नेहमीच द्वितीय श्रेणीचे नागरिक राहिले. धर्म मित्र म्हणूनही हा समाज अरबस्तानात अवांछित मानला गेला.
उमय्यानंतर अब्बासी राजवटीचा काळ आला. तेव्हापासून मावळ्यांचे दिवस उलटले. त्यांची सैन्यात भरती सुरू झाली. सामाजिक अधिकार वाढले. यापैकी बरेच लोक खलिफाचे विश्वासू बनून सत्तेत उच्च पदांवर पोहोचले. तुर्कस्तानपासून भारतापर्यंतच्या काळात सत्तेचा उपभोग घेतलेल्या गुलाम घराण्याचे पूर्वज हे प्रभावी मावळी होते.
भारतात इस्लामचे आगमन या प्रभावशाली मावळ्यांच्या वंशजातून झाले. पर्शियावर ते भारताचे प्रवेशद्वार असलेल्या सिंधपर्यंत त्यांचे राज्य विस्तारले. गझनी घराणेही मावळ्यांचे होते. उझ्बेक लोकांच्या असभ्य आणि लुटमारीच्या शैलीने ज्या प्रकारे उझबक हा द्वेषपूर्ण संबोधन भारतात लोकप्रिय झाला. त्याचप्रकारे या परकीय आक्रमकांसाठी याच मावळाचे अनेक वचन मवाली होऊन हा शब्द असभ्य आणि रानटी म्हणून वापरला जाऊ लागला. त्यामुळे मवाली म्हणजे आता धर्मांतरित नसून गुंड, बदमाश आणि बदमाश आहेत.
भारतीय इतिहास दरोडेखोर, पिंडारी किंवा ठगांच्या कृत्यांनी रंगला आहे. वाळवंट प्रदेशात उंटावरून माल नेणाऱ्या व्यापाऱ्यांचा काफिला लुटण्याचा उद्योग हे ठक करत. व्यापाऱ्यांना लुटण्यापूर्वी हे ठक आधी सर्व माणसांना निर्दयपणे ठार करत. ते कालीमातेचे भक्त असल्याने ठार मारून लुटण्याची त्यांची कार्यपद्धती अजूनही प्रचलित आहे.
दरोडेखोर जबरदस्तीने माल हिसकावून घेतात. परंतु, ठग अनेक प्रकारचा धूर्तपणा करतात. फसवणूक करून लोकांचे पैसे चोरणे, कपट आणि धूर्तपणे माल लुटणे, लोकांना भुलवून त्यांच्या वस्तू हिसकावून घेणे ही ठकांची कार्यपद्धती. प्रवाशांना लुटणे हा त्यांचा स्वभाव आणि त्यांना जिवंत न सोडणे हा त्यांचा धर्म होता.
खबरी ठेवण्याची या ठकांची एक विशेष खुबी होती. त्यांच्यामार्फत ठकांना व्यापाऱ्यांच्या परतीचा मार्ग, ठावठिकाणा, सोयी सुविधा याच्या बातम्या मिळत. या ठगांची इतकी दहशत होती की त्यांचा खात्मा करण्यासाठी इंग्रजांना एक स्वतंत्र पथक तैनात करावे लागले होते. ब्रिटिश अधिकारी विल्यम स्लीमन या पथकाचे प्रमुख होते. या ठकांच्या जाळ्यातून कारण त्यांनी संपूर्ण मध्य भारताला मुक्त केले होते.
कुठलेही शारीरिक बळ न वापरता त्रास, इजा, मार, दमदाटी न करता केवळ बुद्धी कौशल्याच्या साहाय्याने लुबाडतो. भूलथापा देऊन ,लोभ दाखवून, गयावया करून, काही दया उत्पन्न करणारी करुण कहाणी सांगून, विश्वास संपादन करुन, गुंगारा देऊन माणसांना लुबाडणारा तो भामटा.
राजस्थानातील भामटा प्रांतातून हा समाज महाराष्ट्रात आला म्हणून या समाजाला भामटी असे नाव पडले. राजपूत राजाकडे सैनिकी करत असताना अकबराच्या आक्रमणामुळे अनेक सैनिकी जमाती पोटासाठी महाराष्ट्रात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेत इतर विमुक्त भटक्या जमातींप्रमाणे भामटी जमातीचे मोठे योगदान होते. उत्तर पेशवाईपर्यंत त्यांची कामगिरी सुरू होती.
छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून भामटा समाजात मावळे, मराठे अशी आडनावे आहेत. इंग्रजांच्या काळात दऱ्याखोऱ्यात वावरणारा हा समाज होता. तागाचा व्यवसाय स्वीकारून हा समाज दोरखंड, बैलाचे दोर तयार करायचा. बोरू, अंबाडीपासून काढलेल्या तागापासून दावे बनवायचे. ते विकण्यासाठी बाजारात गावात फिरत. बोरू, अंबाडीच्या शेतांसाठी ते गावोगाव भटकंती करत. मालकीची गावे नसल्यामुळे घरही नव्हते.
आदिवासींप्रमाणे या जमातीनेही इंग्रजांविरोधातील लढाईत सहभाग घेतला होता. महाराष्ट्रात इंग्रजी अंमल चालू होईपर्यंत त्यांची लढाई सुरू होती. आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्यासोबत भामटी समाजही क्रांती लढ्यात उतरला होता. इंग्रजांवर हल्ले करून ते खजिना लुटत. इंग्रजानी त्यांना खुल्या तुरुंगात बंदिस्त केले. इंग्रजांनी त्यांच्यावर गुन्हेगारीचे शिक्के मारले. चोर, लुटारू म्हणून बदनाम केले.
३१ ऑगस्ट १९५२ रोजी नेहरू यांनी त्यांना तुरुंगातून मुक्त केले. पण, इंग्रजांनी त्यांना चोर, लुटारू म्हणून बदनाम केले आणि त्यांच्या नावापुढे भामटा म्हणून लागलेला अपराधीपणाचा शिक्का तसाच कायम राहिला.
जशी कार्यपद्धती तशी वेगळी नावे. त्यावरून चोरांच्या श्रेणीचा बोध होतो. जुन्या मुंबईत पोट भरण्यासाठी आलेली अशिक्षित बेकार मंडळी रोजगार न मिळाल्याने जगण्यासाठी मवालीगिरी करत म्हणून तो मुंबईचा मवाली झाला. पुणे हे बुद्धिमत्ता, कौशल्य, चतुराईसाठी प्रसिद्ध आहे. पण हा गुण काहींनी अवगुण केला म्हणून तो पुणेरी भामटा. मुंबईचा मवाली, पुण्याचा भामटा किंवा चोराची आळंदी हे ऐकताना, वाचताना प्रादेशिक दूषण वाटते. मात्र, असे गुन्हेगारीतील महात्मे सगळीकडेच आढळतात.