मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण जामनगरमधून बोलत असल्याचं सांगितलं. आपण लगेचच वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांच्या कार्यालयात फोन करुन तक्रार दिल्याची माहिती पेडणेकरांनी दिली. सुरक्षा वाढवण्या संदर्भात मला विचारलं होतं, पण महापालिकेची सुरक्षा असल्याचं किशोरी पेडणेकरांनी सांगितलं. (Mumbai Mayor Kishori Pednekar calls Vishwas Nangare Patil after threat calls)
“फोन करणारा मी जामनगरमधून बोलतोय, असं सतत बोलत होता. तीन-चार फोन आले, म्हणून मी उचलले. मी फोन स्पीकरवर ठेवला होता. फोन उचलल्यावर त्याने घाणेरड्या भाषेत बोलायला सुरुवात केली. अश्लील शिव्या दिल्या. जर पोलिसांना सांगितलंत, तर मारुन टाकेन, असं म्हणाला होता. मी लगेच विश्वास नांगरे पाटील यांच्या ऑफिसला फोन केला. त्यांनी दखल घेऊन लगेच पत्राद्वारे सगळी माहिती घेतली” अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.
“मी त्याच रात्री पाच दिवसांसाठी बाहेर गेले होते आणि 25 डिसेंबरला मुंबईत आले. माझं, माझ्या पीएचं आणि तिथे उपस्थित असलेल्या विशाखा राऊत यांचं स्टेटमेंट घेतलं असून गुन्हा नोंदवला आहे. फोन करणाऱ्याने खंडणी वगैरे मागितलेली नाही. माझा नंबर कुठेही मिळू शकतो, पण माझ्याबरोबर असलेल्या पीएचा नंबर सगळीकडे असू शकत नाही” असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
“पोलिस आरोपीचा नक्की शोध घेतील, माझा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. नेमका हा कोण व्यक्ती आहे, हे मलाही बघायचं आहे. हे धाडस कोणाचं हेच पाहायचं आहे. जेव्हा तो समोर येईल, तेव्हा नक्कीच मी त्याला सांगेन. एकतर परिचितांपैकी कुणी फोन केला असावा किंवा माझ्याबद्दल खूपच वाईट मत असलेल्या एखाद्या व्यक्तीचा हात असावा किंवा धमकीमागे काहीतरी राजकीय विषय असावा, असा अंदाज व्यक्त केल्याचं पेडणेकरांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी