मुंबई : राज्यातील कोरोना संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहे. नुकतंच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पंचतारंकित हॉटेलची आकस्मिक पाहणी केली. आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या विलगीकरणासाठी अंधेरीतील एका हॉटेलची महापौरांनी पाहणी केली. (Mumbai Mayor Kishori Pednekar Visit Five Star Hotel)
यावेळी आखाती आणि इतर देशांमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना विलगीकरणासाठी पंचातारंकित हॉटेलची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या हॉटेलच्या पाहणीदरम्यान संबंधित आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी एक स्वतंत्र मजला आरक्षित करण्यात आला आहे, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.
तसेच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय प्रवाशांशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येत नाही. या प्रवाशांसाठी हॉटेलमधील स्वतंत्र कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली आहे. यात कर्मचाऱ्यांमार्फतच या प्रवाशांना सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत, असेही महापौर यावेळी म्हणाल्या.
तसेच यासाठी कार्यरत असलेल्या या सर्व कर्मचाऱ्यांची वेळोवेळी कोविड चाचणी सुद्धा करण्यात येत आहे. हॉटेल प्रशासनाची ही चांगली बाब पाहणीदरम्यान निर्दशनास आली आहे. यामुळे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी या ठिकाणी होत असल्याचे महापौरांनी सांगितले.
संबंधित विभागातील दोन डॉक्टर या सर्व हॉटेलसोबत समन्वय ठेवत आहेत. या सर्वच हॉटेलमध्ये या प्रकारची अंमलबजावणी होते की नाही? याकडे लक्ष देण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी संबंधित डॉक्टरांना दिले आहेत.
दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी स्वतःच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे. यापुढे कुठल्याच सार्वजनिक कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय महापौर पेडणेकर यांनी घेतला. कोरोनाचं नव्याने वाढलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, सोशल डिस्टन्सिंगसाठी महापौरांनी हे पाऊल उचललं. इतकंच नाही तर 1 मार्चपासून नगरसेवकांना लस देण्यात येईल, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.
दरम्यान, आता गृह विलगीकरणात कुणाला न ठेवत आता आम्ही सर्वांना काळजी केंद्रात ठेवणार आहोत. तसंच परदेशातून येणारे आणि पळून जाणाऱ्या नागरिकांवर आम्ही गुन्हा दाखल केला जाणार आहे, असं महापौरांनी सांगितलं. (Mumbai Mayor Kishori Pednekar Visit Five Star Hotel)
संबंधित बातम्या :
कल्याण डोंबिवलीत कोरोना फोफावला, आयुक्त अॅक्शन मोडमध्ये, रस्त्यावर उतरुन पाहणी!