मुंबई : मुंबईत आज रेल्वेच्या मध्य आणि हार्बरसह पश्चिम उपनगरील लोकल मार्गावर (Mumbai local) मेगाब्लॉग (Mumbai Mega block) घेण्यात येतोय. मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर (Up Down Fast Line) सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत मेगाब्लॉग असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.32 या वेळेत सुटणाऱ्या उपनगरीय धीम्या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील त्यानंतर मुलुंड स्थानकापासून पुन्हा डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
ठाणे येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील उपनगरीय गाड्या मुलुंड स्थानकापासून अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबून पुढे माटुंगा येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
अप आणि डाउन हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक दरम्यान, विशेष लोकल सेवा चालवली जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.54 या वेळेत पनवेल/बेलापूर/वाशी करीता सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पनवेल – वाशी – पनवेल विभागादरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे- वाशी/नेरूळ स्थानकांतून सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.
हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की, त्यामुळे होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनानं दिलगीरी व्यक्त केलीये.
दरम्यान वेस्टर्न लाईनवर सकाळी 10.35 ते 3.35 या वेळेत मेगाब्लॉक असेल. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान, अप आणि डाऊन जलद मार्गावर दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे.