मुंबईकरांना आता प्रवासाचे नवीन दालन उघडत आहे. आज मुंबईच्या दळणवळात क्रांतीकारक पाऊल पडणार आहे. हवाई, रस्ते, लोकलचे जाळे असणाऱ्या मुंबईकरांना आता शहराच्या उदरातून सुसाट प्रवास करता येईल. मुंबईतील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी मुंबईच्या पोटातून वेगे वेगे धावता येईल. विशेष म्हणजे या प्रवासासाठी मुंबईकरांच्या खिशावर मोठा ताण येणार नाही. अगदी 100 रुपयांच्या आत त्यांना वेळेच्या आत इच्छित स्थळ गाठता येईल.
मुंबई मेट्रो 3 चा पहिल्या टप्प्याचे उद्धघाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिम जिल्ह्याचा दौरा आटपून 4 वाजता मुंबई मेट्रो लाईन -3 आरे जेव्हीएलआर ते बीकेसी विभागाचे उद्धघाटन करतील. मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा आरे ते बीकेसी पर्यत आहे. मुंबईतील संपूर्ण भूमिगत ही मेट्रो 3 असणार आहे आरे पासून बीकेसीपर्यंतच्या या टप्प्यात एकूण 10 स्टेशन आहेतय ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही लाईन सुरु होईल. काही डॉक्युमेंटेशन सुरु आहे त्यानुसार पहिल्या आठवड्यात सुरु होईल असा अंदाज एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी वर्तवला आहे.
48 ट्रेन कॅप्टन 10 महिला
दरदिवशी 96 ट्रिप होणार आहेत. एकूण 9 गाड्या आहेत. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत मेट्रो सुरु असेल. या प्रकल्पासाठी सध्या 48 ट्रेन कॅप्टन आहेत त्यापैकी 10 महिला आहेत. तिकीट दर पहिल्या टप्प्यासाठी कमीत कमी 10 रुपये जास्तीत जास्त 50 रुपये असेल ट्रेनचं काम पूर्ण होईल तेव्हा तिकीटचे दर जास्तीत जास्त 70 रुपये असतील. या मेट्रोचा फेज दोन हा मार्च ते मे पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे. या टप्यात मोठं मोठी स्थानक आहेत त्यामध्ये वरळी आणि गिरगांव येथे मोठी आव्हान आहेत. बीकेसी ते कफ परेड हा टप्पा मार्च ते एप्रिल 2025 पर्यत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे भिडे यांनी स्पष्ट केले.
मेट्रोची मार्गिका 12.5 किमी
वरळी नाका आणि गिरगांव स्टेशन ही चॅलेंजिंग स्टेशन आहेत… त्यांची काम जर डिसेंबर पर्यत झाली तर पूर्ण मेट्रोचं पुढचं काम हे मार्च 2025 पर्यत पूर्ण होईल. मुंबई मेट्रो 3 लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. अंडरग्राउंड मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झचा पहिला टप्पा BKC पासून सुरु होतो. पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार असून ही मार्गिका 12.5 किमी लांबीची आहे. यात 10 स्थानकांचा समावेश आहे.
मुंबईच्या उदरातून करा प्रवास
मेट्रो 3 चे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या टप्प्यातील स्थानके ही 22 ते 28 मीटर जमिनीखाली आहेत. मुंबई विमानतळाजवळील सहार रोड, टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 ही स्थानके सर्वात जास्त खोलीवर आहे. मुंबई मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्यात दहा स्थानकं असतील. मेट्रो लाईन 3चा प्रवास 33.5 किलोमीटर लांब आहे आणि मुंबईच्या उत्तर-दक्षिण दिशांना अधिक चांगल्या प्रकारे जोडण्यासाठी डिझाईन केलेली आहे.
हा मेट्रो मार्ग मुंबईतील सहा प्रमुख व्यावसायिक क्षेत्र, 30 कार्यालयीन क्षेत्र, शैक्षणिक संस्था, प्रमुख रुग्णालयं आणि अनेक वाहतूक केंद्रांना जोडेल. याशिवाय, हा मेट्रो मार्ग शहरातील दोन्ही विमानतळांना देखील जोडतो, ज्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.
मुंबईकरांची मेट्रो 3 मार्गिका कशी असणार?
मेट्रो 3 मार्गिका भूमिगत असणार आहे. ही मेट्रो प्रायोगिक चाचणीत 65 किमी प्रतितास वेगानं धावणार आहे. सध्या या मेट्रोचा बांद्रा ते गोरेगाव आरेपर्यत 12.5 किमीचा ट्रायलरन करण्यात येत आहे. दरम्यान मेट्रोची क्षमता ही 100 किमी प्रतितास प्रवास धावण्याची आहे. ही संपूर्ण मेट्रो भारतीय बनावटीची असून आंध्र प्रदेशमधील श्री सिटी येथे ही मेट्रो बनवण्यात आलीये. मुंबईत मेट्रो 3 च्या सध्या 12 गाड्या दाखल झाल्या आहेत. मेट्रोने प्रवास करताना सुसज्ज सुविधा तसेच सुरक्षित प्रवास प्रवाशांना करता येणार आहे. मेट्रोच विशेष म्हणजे नियंत्रण कक्ष या नियंत्रण कक्षात विविध अत्याधुनिक सुविधा लावण्यात आल्या आहेत, अशी माहिती अश्विनी भिडे यांनी दिली.
मेट्रो 3 साठी आला इतका खर्च
नॅशनल कॉमन मोबाइलिटी कार्ड या मेट्रोला वापरता येणार आहे. 30 ऑक्टोबरपर्यत ही सुविधा तयार करण्यात येणार आहे. मेट्रो 3 साठी 37 हजार 276 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. यामध्ये केंद्राकडून राज्याकडून गुंतवणूक करण्यात आली आहे. गेली चार वर्ष हे टनल तयार आहेत गेल्या अनेक वर्षात पावसाची अधिक नोंद असल्याली बाब लक्षात घेऊन हे टनल बनवले आहेत. जेव्हा थोडं पाणी येईल त्याचा निचरा करण्यासाठी देखील यंत्रणा आहे. खूप जास्त पाऊस झाला तरी मेट्रो बंद पडणार नाही. आरे ते कफ परेड हे काम सरासरी 93 टक्के पूर्ण झालंय पहिला फेज आहे तो 100 टक्के पूर्ण झाला आहे. अनेक पब्लिक वाहतुकीला हा मार्ग जोडण्यात आला आहे. ही लाईन लोकल, बेस्ट, एअरपोर्ट, एसटी डेपो याला हा प्रकल्प जोडला आहे. जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा 13 लाख लोक या ट्रेनने प्रवास करू शकतील, रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्याची या प्रकल्पात क्षमता आहे, असा विश्वास भिडे यांनी व्यक्त केला.
2011 ला मंजूर झाला तेव्हा 23 हजार 900 कोटी रुपये होणार होते पण आता 37 हजार कोटिहून अधिक पैसे लागले आहेत… प्रत्यक्षात टेंडर काढल्यानंतर हे पैसे वाढले आहेत. काही बदल केल्याने ही कॉस्ट वाढली आहे केंद्राकडून आम्हाला पूर्ण पैसे मिळाले आहेत. बुलेट ट्रेनला कनेक्ट करता येईल का याकडे लक्ष दिले जात आहे. आम्ही मध्यंतरी बीकेसी स्थानकाला जोडण्यासाठी जाहिरात केली होती, त्यानुसार प्रतिसाद मिळत असल्याचे भिडे यांनी सांगितले.