मुंबई : मुंबई मेट्रो 7 आणि 2 अ असे मुंबई मेट्रोचे दोन्ही टप्पे 19 जानेवारी 2023 पासून कार्यरत झाल्याने अवघ्या वर्षभरात मुंबई महा मेट्रोने तब्बल दोन कोटी प्रवासी संख्येचा टप्पा पार केला आहे. मुंबई महा मेट्रोचा पहिला टप्पा 2 एप्रिल 2022 रोजी सुरू झाला होता. त्यानंतर 19 जानेवारीपासून दोन्ही टप्पे कार्यरत झाल्याने पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा लाभ झाला आहे. दुसरा टप्पा लागू झाल्यानंतर रोजची प्रवासी संख्या आता 1.6 लाख झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 जानेवारी 2023 मुंबई मेट्रो 7 आणि 2 अ चा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला होता. मुंबईतील पहिल्या घाटकोपर ते वर्सोवा मुंबई मेट्रो वनशी हा मार्ग कनेक्टेड आहे. त्यामुळे मुंबईकरांना पहिले इंटीग्रेटेड मेट्रो नेटवर्क मिळाल्याने मुंबईकरांचा फायदा झाला आहे. मुंबई मेट्रो 7 आणि 2 अ चा पहीला टप्पा कार्यरत होताच दररोज 172 फेऱ्यांद्वारे सरासरी 30,500 प्रवासी मेट्रोने प्रवास करीत होते. त्यानंतर दुसरा टप्पा गेम चेंजर ठरल्याने दररोजची प्रवासी संख्या 1.6 लाख झाली आहे.
मुंबई मेट्रोसाठी एका वर्षात 2 कोटी रायडरशिप गाठणे हा खरोखरच एक महत्त्वाचा टप्पा आहे, प्रवाशांना अत्याधुनिक प्रवास सुविधा आणि सेवा पुरविण्याच्या दिशेने आम्ही सातत्याने काम करीत आहोत आणि तसेच लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहोत. आम्ही प्रवाशांसाठी मुंबई वन नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड देखील आणले असून 81 हजार मुंबईकरांनी त्यास प्रतिसाद दिल्याचे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आणि महा मुंबई मेट्रो संचलन मंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक सी.व्ही.आर. श्रीनिवास यांनी सांगितले.
मुंबई मेट्रोच्या प्रवाशांना पार्किंग सुविधा
मागाठाणे, ओशिवरा, गोरेगाव पश्चिम, मालाड पश्चिम, बोरीविली पश्चिम या पाच मेट्रो स्थानकांजवळील बीइएसटीच्या डेपोंमधील जागेत मेट्रोच्या प्रवाशांसाठी नुकतीच वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यात मागठाणे येथे 126 वाहने, ओशिवरा येथे 115 वाहने, गोरेगाव पश्चिम येथे 116 वाहने, मालाड पश्चिम येथे 86 वाहने तर बोरीविली पश्चिम ( वझिरा नाका ) येथे 40 वाहने पार्क करता येतील. एकूण 483 वाहने पार्क करण्याची क्षमता या पाच पार्किंग स्थानकांवर मिळणार आहे.