मुंबई | 4 ऑक्टोबर 2023 : मुंबईतील पहिली मेट्रो सेवा असलेल्या घाटकोपर ते वर्सोवा मुंबई मेट्रो वनने नवा विक्रम केला आहे. मुंबई मेट्रो वन प्रा. लिमिटेडने ( MMOPL ) कोविड आधीचा सर्वोच्च प्रवासी वाहून नेण्याचा विक्रम तोडत नवा विक्रम रचला आहे. मुंबई मेट्रो वनने 4 लाख 79 हजार 333 इतकी विक्रमी प्रवासी संख्या गाठली आहे. मुंबई मेट्रो वनची रोजची प्रवासी संख्या कोविड काळापूर्वी साल 2019-20 या आर्थिक वर्षात 4 लाख 40 हजार ते 4 लाख 65 हजार दरम्यान होती. मेट्रोचा घाटकोपर ते वर्सोवा मार्ग अत्यंत वर्दळीचा असून पूर्व उपनगरे ते पश्चिम उपनगराला जोडणारा महत्वाचा दुवा आहे.
कोरोनाकाळापूर्वी मुंबई मेट्रो वनची रोजची प्रवासी संख्या चार लाख 40 हजार ते 4 लाख 65 हजाराच्या दरम्यान होती. त्यानंतर कोरोनाची साथ आली त्यावेळी उपनगरीय रेल्वे सोबत मेट्रो सेवाही बंद करण्यात आली होती. 22 मार्च 2020 ते 18 ऑक्टोबर 2020 या काळात 211 दिवस मुंबई मेट्रो वन बंद ठेवण्यात आली. त्यानंतर 19 ऑक्टोबर 2020 रोजी मेट्रोच्या मर्यादीत फेऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु केल्या होत्या. त्या 31 मार्च 2022 पर्यंत सोशल डिस्टन्स ठेवून या फेऱ्या चालविण्यात आल्या.
कोरोनाचे निर्बंध उठविल्यानंतर साल 2020-21 मध्ये दररोज 25 हजार ते 1 लाख 10 हजार असलेले प्रवासी आर्थिक वर्ष 2021-22 पर्यंत 1 लाख 10 हजार पर्यंत वाढले. कोरोनाचे निर्बंध उठवल्यानंतर कार्यालये, शाळा, कॉलेज सुरु झाल्यानंतर मुंबई मेट्रो वनच्या प्रवासी संख्येत हळूहळू वाढ होत एप्रिल 2022 मध्ये रोजची प्रवासी संख्या 2 लाख 50 हजार झाली. आणि आर्थिक वर्ष 2022-23 अखेर ती 4 लाखापर्यंत पोहचली. मेट्रोने आपल्या सेवेत 99 टक्के वक्तशीरपणा पाळल्याने ऑगस्ट 2023 महिन्यात मुंबई मेट्रो वनने कोविड आधीची प्रवासी संख्या ओलांडली. तर 27 सप्टेंबर 2023 रोजी विक्रम प्रस्थापित करीत सर्वाधिक 4 लाख 79 हजार 333 प्रवासी संख्या गाठली आहे.
पहिल्यांदा कोविडसाथीनंतर मुंबई मेट्रो वनने डिसेंबर 2022 मध्ये 1 कोटी मासिक प्रवासी संख्येचा आकडा गाठला. 2023 मध्ये हाच ट्रेंड कायम ठेवत दर महिन्याला मुंबई मेट्रोने एक कोटी प्रवासी संख्या कायम ठेवली आहे. सध्या मुंबई मेट्रो लाईन – 1 वर दररोज 398 फेऱ्या चालविण्यात येत असून पिकअवरला दर 3-4 मिनिटांना एक ट्रेन तर नॉन पिकअवरला दर 7-8 मिनिटांना एक फेरी चालविण्यात येत रिलायन्स इन्फ्राने म्हटले आहे. मेट्रोने प्रवाशांच्या सोयीसाठी डिजिटल पेमेंटसह अनेक योजना राबविल्या आहेत.