अचानक राजीनामा… मिलिंद देवरा यांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात थेटच…

| Updated on: Jan 14, 2024 | 12:58 PM

Milind Deora First Reaction After Resigned from Congress : लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचा मोठा चेहरा असणारे मिलिंद देवरा यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मिलिंद देवरा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. वाचा...

अचानक राजीनामा... मिलिंद देवरा यांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात थेटच...
Follow us on

मुंबई | 14 जानेवारी 2024 : डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. ट्विट करत त्यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. काँग्रेस पक्षात देवरा यांचं मोठं नाव आहे. देवरा कुटुंबाचा काँग्रेस पक्षासोबत मागचे 55 वर्षे स्नेह राहिला. पण आज मिलिंद देवरा यांनी पाच दशकं जुन्या या नात्याला पूर्णविराम दिला. काँग्रेसला रामराम केल्यानंतर मिलिंद देवरा यांनाी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एका वाक्यात देवरा यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी विकासाच्या मार्गावर जात आहे, असं मिलिंद देवरा म्हणाले आहेत.

मिलिंद देवरा यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

दक्षिण मुंबईत होल्ड असणारे वरिष्ठ नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. ट्विट करत देवरा यांनी आज सकाळी राजीनाम्याची घोषणा केली. मागच्या 55 वर्षांपासून देवरा कुटुंब काँग्रेस पक्षाशी जोडलेलं होतं. मात्र आता काँग्रेसमधील प्रवास थांबवत आहे, असं ट्विट करत मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मी काँग्रेस पक्षातील नेत्यांचे आणि कार्यकऱ्यांचे मनापासून आभार मानतो, असंही देवरा म्हणालेत.

आज शिवसेनेत प्रवेश

काही वेळा आधी मिलिंद देवरा यांनी सिद्धिविनायक मंदिरात जात दर्शन घेतलं. थोड्याच वेळात ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 2 वाजता मिलिंद देवरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील. त्यांच्यासोबत काही माजी नगरसेवक आणि नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

देवरा यांच्या नाराजीचं कारण काय?

मिलिंद देवरा हे मुरब्बी राजकारणी आहेत. काँग्रेसमध्ये त्यांचं मोठं प्रस्थ होतं. देवरा यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी का दिली? याची सध्या सर्वत्र चर्चा होतेय. दक्षिण मुंबईच्या जागेवरून निवडणूक लढण्यासाठी मिलिंद देवरा इच्छुक आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये ही जागा ठाकरे गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे देवरा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.