अनलॉकनंतर 7 महिन्यांनी मोनोरेल पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत

| Updated on: Oct 18, 2020 | 10:29 AM

अनलॉकनंतर तब्बल ७ महिन्यांनी मोनोरेल मुंबईकरांच्या सेवेत. आज पहिली मोनोरेल चेंबूर ते संत गाडगे महाराज चौकापर्यंत धावली

अनलॉकनंतर 7 महिन्यांनी मोनोरेल पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत
Follow us on

मुंबई: कोरोना आणि लॉकडाऊनमुळं गेली 7 महिने बंद असलेली मोनोरेल आजपासून पुन्हा एकदा रुळावर आली आहे. चेंबूर ते संत गाडगे महाराज चौकापर्यंत मोनोरेल सुरु करण्यात आली आहे. त्यामुळं प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मोनो रेल मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्यामुळं लोकलवरील ताण काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.  रविवारी सकाळी ७ वाजता आज पहिली मोनो रेल चेंबूर ते संत गाडगे महाराज चौकापर्यंत धावली. ही मोनोरेल चेंबूर ते जेकब सर्कलपर्यंत धावणार आहे. तर वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर चालणारी मेट्रो सेवा सोमावारपासून मुंबईकरांच्या सेवेत येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळं अनलॉकनंतर मुंबईत सार्वजनिक वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. (Mumbai Monorail start from today)

मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर लोकलच्या संख्येत वाढ

–  19 ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेवर लोकलची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलीय. मध्य रेल्वेवर सध्या 481 लोकल सुरु आहेत. त्यात वाढ करुन ही संख्या 706 करण्यात येणार आहे.

–  पश्चिम रेल्वेवरही 15 ऑक्टोबरपासून 194 लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. सध्या पश्चिम रेल्वेवर 506 फेऱ्या सुरु आहेत. लॉकडाऊनपूर्वी पश्चिम रेल्वेवर 1 हजार 376 लोकल फेऱ्या सुरु होत्या.

–  ट्रान्स हार्बर मार्गावर 16 ऑक्टोबरपासून किमान 20, तर हार्बर मार्गावर 5 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. नव्या वेळापत्रकानुसार शेवटची लोकल रात्री 12 वाजून 12 मिनिटांनी सुटेल.

सर्वसामान्य महिलांसाठी लोकल प्रवास तूर्तास नाही!

घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य सरकार सर्व महिला प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देणार असल्याचं एक परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. पण रेल्वे बोर्डानं असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तूर्तास तरी महिलांना रेल्वेनं प्रवास करता येणार नाही. रेल्वे प्रशासनाकडे राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवला असून, त्यावर रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकार विचारविनिमय करणार आहे. त्यानंतरच महिलांसाठी रेल्वे प्रवासाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या: 

…म्हणून तूर्तास महिलांना लोकलनं प्रवास करता येणार नाही

मुंबई मेट्रो उद्यापासून धावणार, ग्रंथालयेही सुरु, शाळा-कॉलेज 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच!

Mumbai Monorail start from today