मुंबई मोनोरेलच्या बिघडणाऱ्या गाड्या, अन् प्रवाशांना होणारा रोजचा मन:स्ताप

| Updated on: Aug 04, 2024 | 6:28 PM

मुंबईत एका गाडीसाठी 15 मिनिटे थांबण्याचा कोणाकडे वेळ नाही. तरीही ज्येष्ठ नागरिकांना तसेच केईएम, टाटा, जेरबाई वाडीया रुग्णालयात जाणाऱ्यासाठी मोनोरेलचा खूप फायदा होत असल्याने लवकर गाड्या वाढवून फ्रिक्वेन्सी वाढवावी अशी मागणी होत आहे.

मुंबई मोनोरेलच्या बिघडणाऱ्या गाड्या, अन् प्रवाशांना होणारा रोजचा मन:स्ताप
mumbai monorail
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

देशातील पहिली मोनोरेल साल फेब्रुवारी 2014 मध्ये दहा वर्षांपूर्वी सुरु झाली होती. चेंबूर ते जेकब सर्कल ( सात रस्ता ) असा 21 किमीचा मार्ग सुरु झाला. परंतू पहिल्यापासूनच हा प्रकल्प पांढरा हत्ती ठरल्याने मुंबई मोनोरेलला कारभार नेहमीच चर्तेत राहीला आहे. सध्या मुंबई मोनोरेलच्या अनेक गाड्यामध्येच बिघडत असल्याने प्रवाशांना याचा फटका बसत आहे. विशेषत: मुंबई उपनगरीय लोकलचा रविवारी मेगाब्लॉक असल्याने मुंबई मोनोरेलच्या गाड्यांना चांगले प्रवासी असतात. परंतू रविवारी एक गाडी गेल्याने नंतर दुसरी गाडी येईल की नाही याचा काहीही थांगपत्ता नसल्याने मोनोरेल प्रवास म्हणजे प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरली आहे. जर गाडी येणार आहे की नाही हे माहिती नसेल तर थेट गेट बंद करावे. म्हणजे प्रवासी जिना चढून वर येणार नाहीत असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

रविवारी उपनगरीय रेल्वे लोकल ट्रेन प्रमाणे मोनोरेलचा देखील मेगाब्लॉक असतो. दर 22 मिनिटे ते एक तासाने एक ट्रेन सोडली जाते. त्याला सरावलेले प्रवासी आशेने एक 22 मिनिटे वाट पाहाण्याची तयारी ठेवूनच स्थानकात प्रवेश करतात. परंतू तिकीट बुकींग करणाऱ्यांना क्लार्कना देखील माहिती नसते की पुढची गाडी नक्की  येणार आहे की नाही ?  त्यामुळे प्रवाशांचे वांदे होत आहेत.  मोनोरेल प्रशासनाने  जर ट्वीट करुन जर प्रवाशांना वेळीच कळविले तर प्रवासी अन्य पर्यायी वाहतूक साधनांचा वापर करतील असे प्रवासी म्हणत आहेत.

सरकारने लक्ष द्यावे

रविवारी मोनोरेलच्या  फेऱ्या मर्यादित असतात. अशा परिस्थितीत एखादा रेक खराब झाल्यास तो कारशेडपर्यंत नेण्यास वेळ लागतो. आज रविवारी अशाच तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांचे हाल झाले. तासाभरात केवळ एकच ट्रेन असल्याने प्रवाशांचे हाल होणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले.

नवीन गाड्या येणार तरी कधी

मोनोरेलचे व्यवस्थापन मलेशियन कंपनीकडून एमएमआरडीएच्या ताब्यात येऊनही मोनोरेलचा कारभार काही सुधारलेला नाही. सध्याच्या मलेशियन कंपनीच्या मोनोरेल वारंवार नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे एमएमआरडीएने दहा नवीन मोनोरेलची ऑर्डर दिली आहे. या दहा मोनोरेल पैकी एक नवीन मोनोरेलचा रेक नुकताच दाखल झाला आहे. या नवीन ‘मेड इन इंडिया’ मोनोरेलच्या ट्रायल चालू आहेत. नवीन दहा ट्रेन दाखल झाल्यानंतर 250 हून अधिक फेऱ्या दररोज चालविणे शक्य होणार असल्याचे म्हटले जात आहे.मोनोरेलचा नवीन रेक बीईएमएल कंपनीचा आहे. या रेकची क्षमता 10 टक्के जादा आहे. सध्या ट्रेनची क्षमता प्रत्येक ट्रेनमागे 568 प्रवासी इतकी आहे. या नव्या मोनोरेलमध्ये अग्निरोधक मटेरियलपासून सर्व पार्ट तयार केलेले आहेत. सध्या मोनोरेल दररोज 142 फेऱ्या चालवित आहे. सोमवार ते शुक्रवार या दिवसात दर 18 मिनिटांनी एक फेरी होत असते. तर रविवारी दर एक तासाने मोनोरेल चालविण्यात येत असते.