गिरीश गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 11 जानेवारी 2024 : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा काल निकाल लागला. हा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला. एकनाथ शिंदे यांचा गट म्हणजेच खरा शिवसेना पक्ष आहे, असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. मात्र शिंदे गटाच्या आणि ठाकरे गटाच्या आमदारांना नार्वेकर यांनी पात्र ठरवलं. दोन्ही गटातील एकही आमदार अपात्र ठरला नाही. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या या निकालानंतर ठाकरे गटाकडून या निकालाचा निषेध करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. संजय राऊतांच्या या ट्विटची जोरदार चर्चा होत आहे.
संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. यात एक फोटो संजय राऊत यांनी शेअर केला आहे. या फोटोत एक बोर्ड दिसतो. काळ्या रंगाच्या बोर्डवर भावपूर्ण श्रद्धांजली, असं लिहिलेलं आहे. ‘लोकशाही’ लिहिलेल्या फोटोला हार घालण्यात आला आहे. 1950- 2023. शोकाकूल – महाराष्ट्र, असा हा बोर्ड आहे. हा फोटो संजय राऊत यांनी शेअर केला आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली
लोकशाही
१९५० – २०२३
शोकाकुल :- महाराष्ट्र pic.twitter.com/SevqrAN0Wt— Sanjay Raut (@rautsanjay61) January 11, 2024
विधानसभा अध्यक्षांनी काल दिलेल्या निकालावरही संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं. काल देण्यात आलेला निकाल हा मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केला आहे. काल नार्वेकर यांनी मॅच फिक्सिंग करून निकाल दिला आहे. या निकालाने लोकांच्या मनात चीड निर्माण झाली आहे. नार्वेकर यांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केलं आहे. भरत गोगावले प्रतोद म्हणून निवड चुकीची आहे, असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेना आणि काँग्रेसवर परिवारवादा आरोप विरोधकांकडून केला जातो. त्याला आता राऊतांनी उत्तर दिलं आहे. आमच्यावर टीका करता मग एकनाथ शिंदे यांनी मुलगा श्रीकांत शिंदे यांना राजकारणात का आणलं? तुम्ही तुमच्या मुलासाठी लांडगे नावाच्या उमेदवाराची उमेदवारी रद्द केली. मुलगा श्रीकांत यांच्यासाठी तिकीट मागितलं. हा परिवारवाद नाहीत का?, असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला आहे.