राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता महापालिका निवडणुका कधी पार पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पण पुढील तीन महिने महापालिका निवडणुका होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट झालं आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून माहिती मिळाली आहे. महापालिका निवडणुका घेण्यासाठी तीन महिन्याचा वेळ लागणार आहे. त्यामुळे तुर्तास कोणत्याही महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता नाही.
विधानसभा निवडणुकीनंतर आता आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी पालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. स्वतंत्र लढून कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे, असं वक्तव्यही संजय राऊतांनी केलं होतं. दरम्यान यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर विजय वडेट्टीवारांनी ठाकरे गट स्वबळावर असेल तर आम्ही देखील वेगळं लढणार, असे विधान केले आहे.
निवडणुका स्वबळावर लढायच्या की, एकत्र याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे. दरम्यान आगामी निवडणुका या ठाकरे गटासाठी पैसे खाण्याची शेवटची संधी असल्याचं म्हणत संजय शिरसाटांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. एकीकडे मविआत संजय राऊतांच्या विधानानंतर काँग्रेसनंही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे महायुती म्हणून मुंबई पालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढू, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकींनंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे. यामुळे येत्या एप्रिलनंतर महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत.
येत्या 22 जानेवारीला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी निवडणुकीसाठी लागणार आहे. पालिकेत प्रभाग रचना, सदस्यांची संख्या यानुसार राज्य निवडणूक आयोग निवडणुकांचा निर्णय घेणार आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टातील याचिका निकाली निघाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा होणार आहे.
विधानसभेनंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मविआ आणि महायुतीकडून जोरदार तयारी सुरु आहे. मात्र, या निवडणुका मविआ एकत्र लढणार का वेगळ्या हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.