निवृत्ती बाबर, मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : आपल्या राजकीय पक्षांचा प्रचार करण्यासाठी किंवा लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी जागोजागी फलक लावून बॅनरबाजी करणाऱ्यांना मुंबई महानगर पालिकेने चांगलाच धडा शिकवला आहे. मुंबई महानगर पालिकेने जानेवारी ते ऑक्टोबर अशा दहा महिन्यांत 33 हजार 742 अनधिकृत बॅनर्स आणि पोस्टरवर तोडक कारवाई करीत ते हटवले आहेत. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात मुंबई महानगर पालिकेकडून सर्वाधिक बॅनर्स आणि पोस्टर हटवण्यात आले आहेत.
मुंबई महानगर पालिकेने मुंबई शहरात जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2023 या दहा महिन्यात 33 हजार 742 अनधिकृत बॅनर्स आणि पोस्टर हटविले आहेत. यात राजकीय, व्यावसायिक, धार्मिक, सामाजिक संघटनांनी लावलेल्या बॅनर्स, बोर्ड आणि पोस्टर्सचा समावेश आहे. यामध्ये सप्टेंबर महिन्यात पालिकेकडून सर्वाधिक बॅनर्स पोस्टर हटवण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक 9,802 पोस्टर, बोर्ड आणि बॅनर्स हटविण्यात आले आहेत. तर फेब्रुवारी महिन्यात सर्वात कमी 1,431 पोस्टर, बोर्ड आणि बॅनरवर कारवाई झाली आहे. राजकीय, कमर्शियल पोस्टर, बॅनर आणि बोर्डांपेक्षा धार्मिक आणि सामाजिक पोस्टर, बॅनर आणि बोर्डवर कारवाई जास्त झाली आहे. याबरोबर पोस्टर, बॅनर आणि बोर्ड बरोबरच शहरात कटआऊट, झेंडे, भिंत्ती रंगवून विद्रुप करणे अशा प्रकारांवर देखील कारवाई करण्यात आली आहे.
शहर विद्रुपीकरणाविरोधातील या कारवाईत राजकीय पक्षांचे एकूण 11,041, कमर्शियल 3,121, धार्मिक 19,580 असे एकूण 33,742 पोस्टर, बोर्ड आणि बॅनर हटविले आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या या कारवाईत राजकीय, कमर्शियल आणि धार्मिक असे मिळून एकूण 20,775 बॅनर, 7,790 बोर्ड, 1,541 पोस्टर, 399 कटआऊट, 2,889 झेंडे, 348 भिंती अस्वच्छ करणे अशी एकूण 33,742 प्रकरणात कारवाई झाली आहे. मुंबई महानगर पालिकेने एकूण 801 प्रकरणात तपास सुरु केला असून 378 प्रकरणामध्ये पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे, तसेच 15 प्रकरणात प्रत्यक्षात एफआयआर ( गुन्हा ) दाखल केला आहे.