मुंबई : मुंबई महानगर पालिकांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध स्कायवॉकचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. शहरातील सुशोभिकरणाचा भाग म्हणून तब्बल 79.68 कोटी रूपयांचा खर्च केला जाणार आहे. मुंबई महानगर पालिका जिंकण्याच्या धैय्याने भाजपाने शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मदतीने जोरदार जाहिरातबाजी केली आहे. वर्तमान पत्रात त्यासाठी जाहिरातीचा रतीब घातला जात आहे. यात मुंबईतील स्काय वॉकच्या सुशोभिकरणाची योजना आखण्यात आली आहे. या योजनेनूसार स्कायवॉकची विविध गटात वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानूसार ए, बी, सी आणि डी अशी वर्गवारी केली आहे.
बोरीवली, अंधेरी, गोरेगाव, सांताक्रुझ (पूर्व) , सांताक्रुझ (पश्चिम) , विलेपार्ले, घाटकोपर (पूर्व ), घाटकोपर (पश्चिम), भांडूप, सायन, कॉटनग्रीन, नानाचौक आणि वडाळा आदी स्कायवॉकवर दिवाबत्ती करण्यात येणार आहे. इलेक्ट्रोकूल इंजिनिअरींग कंपनीने बोरीवली आणि अंधेरीतील स्कावॉक प्रकाशित करण्यासाठी ‘अ’ श्रेणीची निविदा जिंकली असून 20.52 कोटी रुपये (करासह) त्यासाठी खर्च केली जाईल. याच कंपनीने ‘डी’ श्रेणीसाठी कॉटन ग्रीन, नाना चौक आणि वडाळा येथील स्कायवॉक प्रकाशित करण्यासाठी रु. 17.14 कोटी (करासह) निविदा जिंकली आहे.
एएससी पॉवर प्रा.लि.या कंपनी बी आणि सी गटातील निविदा जिंकली असून बी गटात गोरेगाव, सांताक्रुझ आणि विलेपार्ले येथील स्कायवॉकचा 18.05 कोटीतून तर घाटकोपर, भांडुप, सायन या सी वर्गवारीच्या स्कायवॉकचे 18.52 कोटीतून सुशोभिकरण होणार आहे. या कंपन्या येत्या दोन महिन्यात हे काम संपविणार असून त्यांना तीन वर्षांचे मेन्टेनन्सचे कामही दिले आहे. 1,705 कोटी रूपयातून मुंबईच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. एलईडी स्ट्रीप लाईट, ट्यूब आणि फ्डल लाईट बसविण्यात येणार आहेत.