गिरीश गायकवाड, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, मुंबई | 07 नोव्हेंबर 2023 : मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे. त्यानंतर छगन भुजबळ अॅक्शन मोडमध्ये आल्याच दिसतंय. मराठा आरक्षणासंदर्भात सर्व पक्षीय ओबीसी नेते एकवटले आहेत. छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक होणार आहे. आज सकाळी साडे 10 वाजता सर्व ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे. छगन भुजबळ यांच्या बंगल्यावर आज ओबीसी नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा होणार आहे. तसंच ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यानंतर त्याचे काय परिणाम होतील? यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ठोस पावलं उचलत आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठीची प्रक्रिया आता सुरु झाली आहे. अशातच आज राज्यातील सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची मुंबईत बैठक होत आहे.या बैठकीत प्रकाश अण्णा शेंडगे, जे. पी. तांडेल , लक्ष्मण गायकवाड यांच्या सहीत राज्यभरातील महत्वाचे ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत.
छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ नये, अशी भूमिका भुजबळांनी घेतली आहे. या मुद्द्यावरदेखील या बैठकीत चर्चा होणार आहे. तसंच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास त्याचा इतर ओबीसींवर काय परिणाम होऊ शकतो. याची या बैठकीत चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर छगन भुजबळ आणि इतर नेते माध्यमांशी संवाद साधणार आहेत. आपली भूमिका मांडणार आहेत.
राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी काल बीड मध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणच्या संदर्भात आक्रमक भूमिका मांडली. मराठा समजाला कुणबीमधून सरसकट आरक्षण देण्याला कडाडून विरोध केला. कालच्या पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात आपली भूमिका मांडली. छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेला मराठा समाजाचा विरोध आहे. त्यानंतर छगन भुजबळ यांच्या शासकीय निवास्थानाची सुरक्षा व्यवस्था ही वाढवण्यात आली आहे. दंगल नियंत्रण पथक त्यांच्या घराच्या बाहेर तैनात करण्यात आल आहे. अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेत देखील वाढ करण्यात आली आहे.