गणेश थोरात, प्रतिनिधी-टीव्ही 9 मराठी, मुंबई | 09 डिसेंबर 2023 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या नैतिकतेवर भाष्य केलं आहे. भाजपकडे नैतिकता औषधालाही शिल्लक नाही. भाजपच्या नैतिकतेचं ऑडिट गरजेचं आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. नवाब मलिक यांच्या अजित पवार गटात घेतलं जाऊ नये, अशी भाजपची भूमिका आहे. तसं पत्रही देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना लिहिलं आहे. या पत्रात सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा…, असा उल्लेख केला. यावर संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.
भारतीय जनता पक्ष हा नैतिकतेचे फुगे फुगवत आहे ना छाती फुटेपर्यंत… त्यांच्याकडे नैतिकता थोडी तरी शिल्लक आहे का? म्हणून आज आम्ही म्हटलं आहे की, यांच्या नैतिकतेचं ऑडिट केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं ऑडिट होतं. काय खरे काय खोटं कुठे काय… भारतीय जनता पक्षाचा नैतिकतेचे ऑडिट होणं गरजेचं आहे, असं राऊत म्हणालेत.
ज्या मंत्र्यावर दाऊद इब्राहिम आणि त्याचा खास माणूस असलेल्या इक्बाल मिर्ची यांच्याशी संबंध असणारी व्यक्ती सरकारमध्ये मंत्री कशी राहू शकते, असा प्रश्न महाविकास आघाडी सरकारला भाजपने विचारला होता. तर मग प्रफुल्ल पटेल आज कुठे आणि कुणासोबत आहेत? नवाब यांना तुम्ही टार्गेट करता मग प्रफुल्ल पटेल तुम्हाला चालतात? तुम्ही कायदा सुव्यवस्थेवर बोलता ना… नैतिकतेवर तुम्ही बोलता ना… तुम्ही देशभक्तीवर बोलता. मग तर मग देशभक्तीची व्याख्या नवाब मलिक आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी वेगळी आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मोदी- शहांना एक पत्र लिहून “पटेलांना भेटणे देश हिताचे नाही. भाजपच्या नैतिकतेत ते बसत नाही. साहेब, पटेलांना लांब ठेवा” असे सांगण्याचे धाडस दाखवावे. तरच मलिकांच्या बाबतीतील त्यांच्या नैतिकतेच्या उचक्या खऱ्या , नाहीतर पैशाचे सोंग व भाजपचे नैतिकतेचे ढोंग सारखेच . त्यांच्या नैतिकतेचे ऑडिट करावेच लागेल, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केला आहे.