मुंबई : एशियन इन्फ्रास्टक्चर इनव्हेस्टमेंट बँकेचे महासंचालक हुन किम यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची भुरळ पडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात सहभागी होऊन हुन किम यांनी त्यांची कार्यपद्धती जाणून घेतली. तसंच त्यांच्या लोकांमध्ये मिसळून काम करण्याची वृत्ती पाहून त्यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुकही केलंय.
एशियन इन्फ्रास्टक्चर इनव्हेस्टमेंट बँकेचे महासंचालक हुन किम यांच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राज्य सरकारसोबत शेतीसाठी सौरऊर्जेवरील पंप, ग्रामीण भागातील रुग्णालयासाठी सौरऊर्जा उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पांसाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केलं. या कामासाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने सहकार्य केल्यास शेतकऱ्यांना हरित ऊर्जा पुरवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल, असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला सांगितलं.
मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी हे हुन किम यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या समिती दालनात चर्चा करण्यासाठी बसले होते. काही वेळानंतर मुख्यमंत्री स्वतः तिथे त्यांच्या जनता दरबारासाठी आले. त्याचवेळी हुन हेदेखील तिथं उपस्थित असल्याचं पाहून त्यांनी त्यांना देखील या जनता दरबाराचं काम कसं चालतं ते पाहण्यासाठी आमंत्रित केलं.
मुख्यमंत्री शिंदे हे दर बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक संपल्यावर अभ्यागतांच्या भेटीगाठी घेतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक एकनाथ शिंदे भेटायला येतात. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील त्यांच्या दालनात बरेच लोक आले होते. यातीलच एका अपंग व्यक्तीचे काम त्यांनी ताबडतोब करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्याचवेळी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचे महासंचालक हुन किम हेदेखील तिथेच उपस्थित होते.
सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तातडीने जाणून घेऊन त्यांची तिथल्या तिथे सोडवणूक करण्याची मुख्यमंत्री शिंदे यांची पध्दत पाहून हुन किम प्रभावित झाले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन त्यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुकही केलं.
मुख्यमंत्र्यांच्या या जनता दरबारात अनेक लोकं लांबून लांबून येतात. त्यांचे विषय समजावून घेत अधिकारी तातडीने त्यावर संबंधित विभागाचे शेरे मारून पुन्हा आलेल्या व्यक्तीकडे देतात. त्यानंतर मुख्यमंत्री आलेल्या व्यक्तीकडून तो विषय समजून घेत त्यावर स्वाक्षरी करतात. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यलयातील अधिकारी त्यांचे निवेदन स्वीकारून ते त्या त्या विभागाकडे पुढील कारवाईसाठी पाठवण्यात येतात.