अक्षय मंकणी, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 13 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणुकीला अवघे काहीच महिने राहिलेले असताना काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची माहिती आहे. ते आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचीही शक्यता आहे. काँग्रेसला राम-राम करत मिलिंद देवरा हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. देवरा शिवसेना शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. जर मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल. देवरा जर शिंदे गटात गेले तर शिवसेना आणि पर्यायाने महायुतीची ताकद वाढणार आहे.
मिलिंद देवरा हे काँग्रेसचे बडे नेते आहेत. मुंबईत विशेषत: दक्षिण मुंबईत त्यांचा होल्ड आहे. काँग्रेसमध्येही त्यांचा मोठा समर्थक वर्ग आहे. अशाचत ही निवडणूक लढण्याची मिलिंद देवरा यांची इच्छा आणि तयारी आहे. मात्र या जागेवर देवरा यांनी तिकीट मिळण्याची शक्यता सध्या कमी दिसते आहे. त्यामुळे देवरा काँग्रेसमध्ये नाराज असल्याची माहिती आहे. त्यामुळे देवरा काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊ शकतात.
लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. यंदाची ही निवडणूक लढण्यास मिलिंद देवरा इच्छुक आहेत. दक्षिण मुंबईच्या जागेवरून निवडणूक लढण्यास मिलिंद देवरा तयार आहेत. मात्र सध्याची स्थिती पाहता दक्षिण मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आहेत. ‘जिंकेल त्याची जागा’ हे महाविकास आघाडीचं प्राथमिक सूत्र आहे. त्यामुळे या जागेवर ठाकरे गटाने दावा केला आहे. जर ही जागा ठाकरे गटाकडे गेली. तर मिलिंद देवरा यांची मोठी अडचण होऊ शकते. त्यामुळे मिलिंद देवरा नव्या पर्यायाच्या शोधात असल्याचं दिसतं आहे.
मिलिंद देवरा हे काँग्रेसचे मुंबईतील बडे नेते आहेत. दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे पुत्र आहेत. त्यांनी 2004 आणि 2009 ची लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात देवरा हे राज्यमंत्री होते. 2014 आणि 2019 मात्र मिलिंद देवरा यांचा पराभव झाला. ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांना पराभूत केलं. आता मिलिंद देवरा काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे.