महायुतीमधील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे. महायुतीत ही जागा शिवसेनेसाठी सुटली आहे. शिवसेनेकडून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दक्षिण मुंबई हा मुंबईतला महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघावर भाजपचा देखील दावा होता. भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. त्यामुळे शिवसेनेला हा मतदारसंघ सुटतो की नाही? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. अखेर शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी जाहीर झाली आहे.
दक्षिण मुंबईत ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अरविंद सावंत यांच्याकडून प्रचारालादेखील सुरुवात झाली आहे. तर महायुतीत दक्षिण मुंबईचा तिढा काही केल्या सुटत नव्हता. भाजप आणि शिवसेना यांच्यात या मतदारसंघासाठी रस्सीखेच सुरु होती. अखेर या मतदारसंघाचा तिढा आज सुटला आहे. यामिनी जाधव यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. पण भाजप नेत्यांची नावे देखील चर्चेत होती. त्यामुळे तिढा वाढताना दिसत होता. अखेर हा तिढा आज सुटला आहे.
यामिनी जाधव या मुंबई महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यामिनी जाधव यांची नुकतीच भेट झाली होती. यामिनी जाधव यांच्या ठाण्यातील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यामिनी जाधव यांची भेट झाली होती. या भेटीत तब्बल दीड तास चर्चा झाली होती. या चर्चेतच यामिनी जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं होतं. त्यानंतर आज अधिकृतरित्या प्रसिद्धीपत्रक जारी करत माहिती जारी करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून आज अधिकृतपणे माध्यमांसाठी प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या प्रसिद्धी पत्रकात 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईच्या जागेसाठी अधिकृत उमेदवार म्हणून यामिनी जाधव यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. यामिनी जाधव यांनी प्रचारालादेखील सुरुवात केली आहे. गेल्या एक ते दोन आठवड्यांपासून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांना पक्षाकडून प्रचाराला सुरुवात करण्याचे आदेश दिले होते. यामिनी यांनी बुथ स्तरावर तसेच वॉर्ड स्तरावर पदाधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायला सुरुवातही केली आहे.
दक्षिण मुंबई मतदारसंघ हा लक्ष्मीपुत्रांचा मतदासंघ आहे. या मतदारसंघात अनेक धनाड्य नागरीक वास्तव्यास आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा मानला जातो. या मतदारसंघात आता शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे तिथले विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्या पराभवाचं मोठं आव्हान शिंदे गटाला तिथे असणार आहे.