मुंबई | 19 ऑक्टोबर 2023 : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला कालअटक करण्यात आली. त्यानंतर आज या ड्रग्स प्रकरणामध्ये आता चौकशीला वेग आला आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांची टीम रात्री 11 वाजता मुंबईमध्ये दाखल झाली आहे. अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये ही पुणे पोलिसांची टीम आहे. मुंबई पोलिसांकडे असणाऱ्या आणखी 2 आरोपींचा ताबा पुणे पोलीस घेणार आहेत. तर दुसरीकडे भूषण पाटीलचा ताबा 20 तारखेला मुंबई पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे. ललित पाटील जेव्हा पुण्यातील ससून रुग्णालयात होता. तेव्हा तो पैसे देऊन ससून रूग्णालयातील कर्मचारी आणि पोलिसांना मॅनेज करायचा. ससूनमधील मुक्काम वाढवण्यासाठी ललितने डॉक्टर आणि पोलिसांना पैसे दिले, अशी माहिती आता समोर येत आहे.
ललित पाटील प्रकरणात आता पुणे पोलीसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी दोन महिलांना या प्रकरणात ताब्यात घेतलं आहे. ललित पाटील याला पळून जाण्यासाठी दोन महिलांनी मदत केली होती,अशी माहिती आहे. या दोन्ही आरोपी महिलांना पुणे पोलिसांनी नाशिकमधून ताब्यात घेतलं आहे. आज पहाटे दोन्ही महिलांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणानंतर पुण्यातील ससून रुग्णालय प्रशासन अलर्टवर आहे. ससून रुग्णालयातील कैद्यांच्या वॉर्डसाठी प्रशासनाकडून नवीन जागेचा शोध सुरू आहे. दुसऱ्या जागेवर स्थलांतरित करण्याच्या हालचाली ससून प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. कैद्यांचा वॉर्ड हलवण्यासाठी पोलीस आणि कारागृह प्रशासनाची देखील मंजुरी लागणार आहे. ससून रुग्णालयातील कैद्यांचा वार्ड नंबर 16 हलवण्यात येणार असल्याची माहिती आहे. ससून रुग्णालय प्रशासनाकडून नव्या जागेसाठी चाचपणी सुरू आहे.
ललित पाटील पैसे देऊन ससून रूग्णालयातील कर्मचारी आणि पोलिसांना मॅनेज करायचा. ससूनमधील मुक्काम वाढवण्यासाठी ललितने डॉक्टर आणि पोलिसांना मोठ्या प्रमाणात पैसे दिले. ससून रुग्णालयातून तो ड्रग्ज सिंडीकेट चालवत होता. ललितवर नजर ठेवण्यासाठी तैनात असणाऱ्या पोलिसांनाही तो पैसे द्यायचा, अशी माहिती आहे.