मुंबई | 03 ऑक्टोबर 2023, निखील चव्हाण : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यू तांडवावरून ते संतापले आहेत. थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. या गंभीर घटनेमुळे आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या खात्यात अजिबात इंटरेस्ट नसल्याचं दिसून येतंय. वेगळ्याच कामात ते अडकलेले असतात. निष्पाप लोकांचे जीव जात आहेत आणि सरकारला यांचं गांभीर्य काहीच वाटत नाही, असं संजय राऊत म्हणालेत.
नांदेडसारख्या ठिकाणी सरकारी रुग्णालयात 24 तासात 24 रुग्ण मृत्यू होतात. यावरती सरकार अस्तित्वातच नाहीये, असं दिसून येतंय. ही पहिलीच घटना नाहीये. याआधी देखील ठाण्यातील कळव्याच्या पालिका रुग्णालयातदेखील असा प्रकार घडला होता. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शासकीय रुग्णालयात ही परिस्थिती आहे. कळव्यातील प्रकरणानंतर अजित पवारांनी प्रश्न विचारला होता की, ठाण्यामध्ये असा प्रकार कसा घडू शकतो? त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याचं टाळलं. मुख्यमंत्री फक्त ठाण्याचे पालक नाहीत. ते संपूर्ण राज्याचे पालक आहेत. राज्यात तुटवडा असताना सरकारला फक्त जमिनीचे व्यवहार, परदेश दौरे अन् माणसं फोडण्यातच इंटरेस्टेड दिसतंय. यांच्यात थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाला विधिमंडळ नोटीस पाठवणार आहे. विधिमंडळ सूत्रांनी ही माहिती दिली आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधिमंडळाच्या कामाला वेग आला आहे, असं अजिबात म्हणता येणार नाही. कारण अशा प्रकारचे समन्स पाठवून शिवसेना कोणाचे विचारात असतील तर ते वेळ काढू पणा करत आहेत. दहा-बारा आमदार फुटले म्हणजे पक्ष फुटला असं होत नाही. पक्ष वेगळा आणि विधिमंडळ पक्ष वेगळा आहे. तरी विधिमंडळामध्ये अशा प्रकारच्या नोटिसा पाठवत आहेत. तर कागदावरून शिवसेना कोणाची हे ठरत नाही. बाळासाहेबांनी शिवसेना कागदावरती निर्माण केली नाही. तर जनतेच्या मनामनात शिवसेना निर्माण केलेली आहे. आम्हाला महाराष्ट्रात न्याय मिळणार नाही हे माहित आहे. आम्हाला नाही द्यायचं असतं तर हे गैरकानून सरकार चालून दिला नसता. आम्हाला न्याय हा सर्वोच्च न्यायालयात मिळेल. आमच्यावरती अन्याय केला तो प्राथमिक निवडणूक आयोगाने केला. भाजपचे नेते जे बोलतात. तेच निवडणूक आयोग कसं काय करतं?, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
संपूर्ण देशात अशी जनगणना होणं गरजेचं आहे. त्याला विरोध असण्याचं कारण नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीत त्याच्यावरती चर्चा झाली. त्याच्यावर सर्वांचं एकमत आहे, असंही राऊत म्हणाले.