भारत जोडो यात्रेत सहभागी होतो, पण…; प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससमोर ‘ती’ अट ठेवली

| Updated on: Jan 17, 2024 | 1:02 PM

Prakash Ambedkar on Rahul Gandhi Invitation for Congress Bharat Jodo Nyay Yatra : भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचं आमंत्रण प्रकाश आंबेडकर यांनी स्विकारलं पण...; काँग्रेस समोर कोणती अट ठेवली? प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधी यांना जे पत्र लिहलं त्यात नेमकं काय? वाचा...

भारत जोडो यात्रेत सहभागी होतो, पण...; प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससमोर ती अट ठेवली
Follow us on

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 17 जानेवारी 2024 : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सध्या सुरु आहे. या भारत जोडो न्याय यात्रेत व्हावं, असं आमंत्रण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना दिलं आहे. हे आमंत्रण प्रकाश आंबेडकर यांनी स्विकारलं आहे. मात्र आंबेडकरांनी काँग्रेससमोर एक अट ठेवली आहे. देशातील विरोधकांच्या इंडिया आघडीत आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत सहभागी करून घेतलं. तरच भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.

‘वंचित’ इंडिया आघाडीत येणार?

लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. अशात देशातील विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. देशभरातील विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत ‘वंचित’ सहभागी होणार का? असा प्रश्न आहे. मागच्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीतील नेत्यांचा संपर्क सुरु आहे. मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावर अद्याप एकमत झालेलं नाही. त्यामुळे वंचित मविआमध्ये सामील होणार की नाही, याबाबत स्पष्टता आलेली नाही.

भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचं आमंत्रण राहुल गांधी यांनी प्रकाश आंबेडकरांना आमंत्रित केलं. तेव्हा आंबेडकरांनी या यात्रेत सहभागी होण्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र इंडिया आघाडी सामील करून घ्या, तरच भारत जोडोत सहभागी होतो, अशी अटही आंबेडकरांनी ठेवली आहे. तसं पत्राद्वारे आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना कळवलं आहे.

प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं

श्री. राहुल गांधी यांस,

आपण आपल्या भारत जोड़ो न्याय यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले याबद्दल आपले आभार.

तथापि, मी या वस्तुस्थितीचा पुनरुच्चार करू इच्छितो की काँग्रेस अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही VBA ला अद्याप INDIA आघाडी अथवा मविआ मध्ये समाविष्ट करून घेतलेले नाही. यात विडंबन म्हणजे आपण पाठवलेल्या निमंत्रणात “आपण INDIA आघाडीचे महत्त्वाचे घटक आहात” असे म्हटले आहे.

सध्याच्या धर्मांध, जातीय, विभाजनकारी वातावरणात मोदींच्या सरकारविरोधात असणाऱ्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे, जे की संघटित शक्ती व कार्यक्रम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजप आरएसएसच्या दुष्ट करावयांविरोधात लढ्याला टिकवून ठेवण्यासाठी गरजेचं आहे.

VBA अविरतपणे भाजप आरएसएसशी लढत आहे. VBA हा पक्ष केवळ ६ वर्षांचा असला तरी माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा वैचारिक लढा हा काही नवीन नाही. हा लढा म्हणजे मनुस्मृतीने संहिताबद्ध आणि टिकवून ठेवलेल्या हिंदू जाती व्यवस्थेविरुद्ध एक बंड आहे. हा लढा आम्हाला महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि माझे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून मिळालेला वारसा आहे, किंवा त्याहीपेक्षा त्यांनी दिलेली सर्वात महत्त्वाची शिकवण आहे. या सर्वांचा विश्वास होता की धर्म हा माणसाच्या वैयक्तिक आयुष्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतो आणि त्यांनी विविध धार्मिक विचारांचा पुरस्कार केला. आज आम्ही मुस्लिम, ओबीसी, गरीब मराठा आणि अर्थातच दलीत, आदिवासी व इतर भेदभावग्रस्त, उपेक्षित लोकांसाठी लढतो व त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत दिलेल्या शेवटच्या भाषणातला काही भाग आपण इथे लक्षात घेतला पाहिजे. बाबासाहेबांनी या नवीन गणराज्यासमोर येऊ शकणारी आव्हाने नमूद केली होती, आणि दुर्दैवाने ती भीती खरी होताना दिसत आहे.

“.. जर राजकीय पक्षांनी देशापेक्षा जातीला जास्त महत्त्व दिलं, तर देशाचं स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल, आणि कदाचित ते आपण कायमचं गमावून बसू. या परिणामापासून आपण सर्वांनी दृढनिश्चय करून बचाव केला पाहिजे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपले स्वातंत्र्य वाचवण्याची आपली तयारी असली पाहिजे.”

“आपली ही राजकीय लोकशाही आपल्याला सामाजिक लोकशाही सुद्धा करावी लागेल. सामाजिक लोकशाहीचा पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकत नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तर अशी जीवन पद्धत जी स्वातंत्र्य, समता व बंधुता यांना जीवनाची तत्व म्हणून स्वीकार करेल. ही तत्व त्रिरत्नतील वेगवेगळी सूत्र मानली जाऊ नये.”

बाबासाहेबांचा संदेश, जो वारसा आम्हाला शिकवण म्हणून मिळाला आहे, तो अगदी सोपा आहे – सामाजिक लोकशाही, जी स्वातंत्र्य, समता, बंधुतेला मान्य करेल. माझे आणि माझ्या सहकाऱ्यांचेही तुम्हाला हेच सांगणे आहे. जात, धर्म, पंथाला देशापेक्षा वर ठेवणाऱ्या भाजप आरएसएस शी आपल्याला लढायचे असेल, तर काँग्रेसने  सामाजिक लोकशाहीचा अजेंडा पुढे करावा. केवळ शब्दांनीच नव्हे कृती कार्यक्रमातूनही. सवर्ण केंद्रित राजकारण सामाजिक लोकशाहीला हानिकारक आहे.

आपल्या भारत जोडो न्याय यात्रेचे निमंत्रण मी सशर्त स्वीकारत आहे. दीर्घ प्रतिक्षित INDIA आघाडी व मवीआ मध्ये समाविष्ट होण्याचे निमंत्रित येत नाही तोपर्यंत या यात्रेत सहभागी होणे माझ्यासाठी अवघड आहे. हे निमंत्रण नसताना तुमच्या यात्रेत सहभागी झाल्यास युती झाल्याचे अंदाज बांधले जाऊ लागतील, जी अजून झालेलीच नाही, आणि या सर्वाचे नकारात्मक परिणाम होतील. तथापि आपण VBA ला INDIA आघाडी तसेच मवीआ मध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण द्यावे असे आमचा आग्रह आहे.

आपला.

प्रकाश आंबेडकर

अध्यक्ष – वंचित बहुजन आघाडी