मुंबई / ब्रिजभान जैस्वार : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणी आरोपी अरमान खत्रीला मुंबई सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचा आदेश दिला आहे. अरमान खत्रीची आज पोलीस कोठडी संपत असल्याने विशेष पोलीस एसआयटीने त्याला मुंबई सत्र न्यायालय विशेष अॅट्रोसिटी कोर्टात हजर केले. सुनावणी दरम्यान वाढीव पोलीस कोठडीची मागणी एसीआयटीकडून करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळत आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली. बचाव पक्षाने अरमानच्या जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. यावर न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आम्हाला दर्शनच्या मोबाईलचा तात्पुरता एफएसएल रिपोर्ट प्राप्त झाल्याचे सरकारी पक्ष आणि पोलिसांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आलं. या रिपोर्टमध्ये दर्शनने अरमानची माफी मागितली असल्याचं स्पष्ट होत असल्याचा दावा त्यांनी कोर्टात केला. “अरमान मुझे माफ कर दे, मै मुंबई छोड कर घर जा रहा हुं,” असा संदेश दर्शनने अरमानला पाठवला असल्याचं एसआयटीकडून कोर्टात सांगण्यात आलं.
तसेच या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता राज्याच्या पोलीस महासंचालकांनी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचं एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. सध्या कॉलेज सुरू असल्याने सह विद्यार्थी आणि इतर सहकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यास उशीर लागत असून, वाढीव पोलीस कोठडीची मागणी एसआयटीने केली.
मात्र या मागणीला विरोध करत या आधीच सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून, रिमांड अर्जात काहीच नवीन नसल्याचा दावा बचाव पक्षाकडून करण्यात आला. तसेच अरमान काही सराईत गुन्हेगार नसून, तो तपासाला सहकार्य करत असल्याचा दावाही बचाव पक्षाने केला. अरमानला न्यायालयीन कोठडी मिळताच त्यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. लवकरच त्यावर सुनावणी अपेक्षित आहे, अशी माहिती अरमान खत्रीचे वकील अॅड. दिनेश गुप्ता यांनी दिली.