मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा महामार्गांवरून जात असताना आपल्याला टोल भरावा लागतो. पण हा टोल आपण नेमका का भरतो? असा प्रश्न अनेकांना पडतो. तसंच आपण रोड टॅक्स देतो मग पुन्हा टोल का असाही प्रश्न मनात निर्माण होतो. याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेखात मिळतील. आपल्या देशात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थातच (NHAI) द्वारे रस्त्यांची निर्मिती आणि त्याची देखभाल केली जाते. अशावेळी रस्त्याच्या निर्मितीसाठी आलेला खर्च टोल टॅक्सच्या माध्यमातून वसूल केला जातो. राष्ट्रीय महामार्ग, बोगदे, द्रुतगती मार्ग आणि इतर काही मार्गांवर टोल टॅक्स घेतला जातो.
टोल टॅक्स आणि रोड टॅक्स या दोन्हींमध्ये फरक आहे. हे दोन टॅक्स वेगळे आहेत. जेव्हा तुम्ही एखादं नवं वाहन खरेदी करता तेव्हा त्यावर जीएसटी आकारला जातो. वाहनाची नोंदणी करताना आरटीओकडून रोड टॅक्स घेतला जातो. याला रोड टॅक्स म्हणतात. भारतातील सगळ्याच वाहनांवर हा रोड टॅक्स आकारला जातो. हा टॅक्स राज्य सरकारच्या तिजोरीत जातो. हा टॅक्स राज्य सररकार आकारतं. त्यामुळे प्रत्येक राज्यात तो वेगवेगळा असू शकतो. दुचाकी वाहनांवर हा कर कमी असतो. तर चार चाकी वाहनांवर हा कर जास्त असतो. हा रोड टॅक्स हा वाहन खरेदी करताना एकदाच भरावा लागतो. तो पुन्हा भरावा लागत नाही. पण हेच तुमचं वाहन हे व्यावसायिक असेल तर त्याचा दरवर्षी रोड टॅक्स भरावा लागतो. अन्यथा तुमचं वाहन जप्त होऊ शकतं.
टोल टॅक्स हा ठराविक वाहनांवरच लावला जातो. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थातच (NHAI) द्वारे तयार केल्या गेलेल्या रस्त्यांवर हा टोल आकारला जातो. त्या रस्त्याच्या लांबीवर हा कर अवलंबून असतो. दोन टोलनाक्यांमध्ये 60 किलोमीटरचं अंतर असणं बंधनकार आहे. तसंच आता तर 60 किलोमीटरच्या परिघात एकच टोल नाका असावा असा नियम आहे.