गोविंद ठाकूर, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, मुंबई | 16 जानेवारी 2024 : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या आधी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी एक प्रश्न उपस्थित केला. भाजपचा नारा होता मंदिर वहीं बनायेंगे. पण ज्या ठिकाणी मंदिर बांधायची चर्चा होती. त्या ठिकाणी मंदिर बांधलं गेलं नाही. त्या जागेपासून 4 किलोमीटर अंतरावर राम मंदिर बांधण्यात आलंय. मूळ जागा अजूनही तशीच आहे, असं संजय राऊत म्हणाले. त्यावर आता भाजपकडून उत्तर देण्यात आलं आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊतांना अयोध्येला घेऊन जाणार असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतला मी सांगेल त्याच्या तिकीटचा खर्च मी करेल आणि अयोध्येला घेऊन जाईल. त्याने पोलीस संरक्षण घेऊ नये. ज्या ठिकाणी बाबरी मस्जिद होती. त्या जागी आमचा राम मंदिर बनत आहे. त्याने त्याच्या स्वतःच्या डोळ्यांनी भांडूपमध्ये बसून मोठे मोठे दावे करू नयेत. त्याच्यापेक्षा जास्त माहिती तिकडच्या राहणाऱ्या माणसांकडे, महंत महाराजांकडे आहे. जिथे मस्जिद होती. तिथेच राम मंदिर बनत आहे. याच्यात हिंमत असेल तर त्यांनी माझ्यासोबत अयोध्येला यावं. पण तो परत येण्याची गॅरंटी नाही, असं नितेश राणे म्हणाले.
मुंबईच्या ओशिवरा परिसरामध्ये भाजपाच्या वतीने 50 फुटी राम मंदिराची प्रतिकृती बनवण्यात येत आहे. भाजप नेते संजय पांडे यांच्या प्रयत्नातून ही राम मंदिराची प्रतिकृती निर्माण केली जात आहे. भाजप नेते, आमदार नितेश राणे यांच्या हस्ते या मंदिराच्या प्रतिकृतीच्या कार्यक्रमाचे भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी नितेश राणे बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.
आयोध्येत भव्य राम मंदिर बनत आहे. इथे त्याची प्रतिकृती उभी राहते हे फार मोठे पुण्याचं काम आहे. राम मंदिर बनल्यानंतर प्रत्येकाला स्वतः अयोध्येला जाऊन आशीर्वाद घेणे सुरुवातीला शक्य नसेल.तोच अनुभव मुंबईत राहून राम भक्तांना घेण्यात यावा हिंदूंना मिळावा, याच भावनेतून हा फार मोठा उपक्रम सुरू केला आहे. सकल हिंदू समाज एकत्र येऊन समाज एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं, याचं हे उदाहरण आहे. हिंदू समाजाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं. तर असे असंख्य धक्के हिंदू समाज देऊ शकतो, असंही नितेश राणे म्हणाले.