अविनाश माने, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी मुंबई | 29 फेब्रुवारी 2024 : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उरवण्याची भाजपची तयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीचं तिकिट मिळू शकतं. तर पंकजा यांनी लोकसभेची निवडणूक लढल्यास धनंजय मुंडे त्यांचे स्टार प्रचारक म्हणून काम पाहतील, अशी माहिती आहे. राज्याच्या राजकारणात याची चर्चा होतेय. यावर पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्या आज मुंबईत आढावा घेत आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
पूर्ण मी संघटनेच्या रोलमध्ये आहे. प्रीतम मुंडे दहा वर्षे खासदार राहिल्या आहेत. त्यांनी चांगलं काम केलं. राष्ट्रवादीसोबत युती झाल्यामुळे माझ्या मतदारसंघावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मी राज्यातच नव्हे देशात स्टार प्रचारक राहिलेले आहे. त्यामुळे माझ्या लोकसभेच्या उमेदवार कोणी असो स्टार प्रचारक आणि सर्व जबाबदारी माझी असेल. भविष्यात राष्ट्रवादीची युती असेल त्यांचे स्टार प्रचारक कोण असेल ते त्यांचे ठरवतील. भारतीय जनता पार्टीचे निर्णय दिल्लीत होतात. तिथे आम्हीच पोहोचू शकतो, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
तुम्ही लोकसभा निवडणूक लढणार की विधानसभा? आणि विधानसभा लढण्यास पुन्हा तुमचे बंधू धनंजय मुंडे यांच्यासोबत तुमचा सामना होण्याची शक्यता आहे, यावर तुमची प्रतिक्रिया काय? असं विचारलं असता आम्ही हे सामने ऑलरेडी करून झालेलो आहोत. मुंडे साहेबांची 2004, 2014 प्रीतम ची 2014 ची निवडणूक आम्ही विरोधात लढलोय. त्याचा अनुभव घेऊन झाला आहे. आता पाहू काही वेगळा अनुभव वाटायला येतोय का ते…, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, बीडमध्ये भाजप नेत्यांची गुप्त बैठक होत आहे. जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये ही बैठक होतेय. या बैठकीला सुधीर मुनगंटीवार, प्रितम मुंडे यांची उपस्थिती आहे. या गुप्त बैठकीमुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. खासदार प्रीतम मुंडे यांचंही मत या बैठकीत जाणून घेणार जाणार आहे. उमेदवारी कुणाला दिली जावी, याबाबत चाचपणी सुरू आहे. बैठकीला जिल्ह्यातील सर्वच महत्वाचे पदाधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष आहे.