मुंबई | 22 डिसेंबर 2023 : प्रसिद्ध कवी, चित्रकार इमरोज यांचं निधन झालंय. वयाच्या 97 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत त्यांचं निधन झालं. इमरोज यांच्या निधनाने साहित्य वर्तुळावर शोककळा पसरली आहे. इमरोज मागच्या काही दिवसांपासून आजारी होते. काही दिवसांआधी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारांनंतर त्यांची प्रकृती सुधारतही होतं. डिस्टार्ज मिळाल्याने त्यांना घरी देखील आणण्यात आलं. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील कांदिवलीत ते राहत होते. कांदिवलीतील या राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
इमरोज यांचा जन्म पंजाबमधला. 26 जानेवारी 1926 ला इमरोज यांचा जन्म झाला. इमरोज प्रसिद्ध कवी होते. त्यांचे शब्द म्हणजे प्रेमाची अर्थपूर्ण कविता असायची… कवी असण्यासोबतच इमरोज हे प्रसिद्ध चित्रकारही होते. अनेक पुस्तकांचं कव्हर त्यांनी तयार केलं. इमरोज यांनी कवयत्री अमृता प्रितम यांच्यासाठी पुस्तकही लिहिलं. ‘अमृता के लिए नज्म जारी है’ हे पुस्तक इमरोज यांनी अमृता यांच्यासाठी लिहिलं आहे. त्यांच्या याच पुस्तकातील काही ओळी…
कभी-कभी खूबसूरत खयाल,
खूबसूरत बदन भी
अख़्तियार कर लेते हैं।
इमरोज यांचं खरं नाव इंद्रजित सिंह… पण अमृता प्रितम यांनी त्यांना इमरोज म्हणून पुकारलं अन् इंद्रजितचा इमरोज कधी झाला हे त्यांना स्वत: ला देखील लक्षात आलं नाहीत. अमृता प्रितम आणि इमरोज हे ‘पार्टनर’ होते. या दोघांनी लग्न केलं नाही. मात्र जेव्हा-जेव्हा नितळ आणि निस्वार्थ प्रेमाचा विषय निघतो तेव्हा तेव्हा अमृता आणि इमरोज यांचा उल्लेख होतोच.
वयाच्या 40 व्या वर्षी इमरोज अमृता यांना भेटले. अमृता या इमरोज यांच्यापेक्षा सात वर्षांनी मोठ्या होत्या. अमृता कायम एक तक्रार करायच्या की, इमरोज तुम्ही मला माझ्या आयुष्याच्या संध्याकाळी का भेटलात? तुम्ही या आधीच मला भेटायला हवं होतं. माझ्यासोबत असायला हवे होता. या दोघांची केमेस्ट्री एवढी ग्रेट होती की, प्रेम म्हणजे काय आणि एकमेकांचे सोबती असणं काय असतं? हे या दोघांकडे पाहिलं की लक्षात यायचं. अमृता आणि इमरोज यांचं एकत्र असणं म्हणजे प्रेमाची ‘अमृत’ कविता असे.
अमृता आजारी होत्या तेव्हा शेवटच्या काळात अमृता यांनी इमरोज यांच्यासाठी एक कविता लिहिली. इमरोज यांच्या जाण्याने अनेकांना याच कवितेची आठवण झाली. अमृता प्रितम यांनी 2005 साली जगाचा निरोप घेतला. अमृता आणि इमरोज दोघेही आपल्यात नाहीत. मात्र त्यांच्या कविता, त्यांचे शब्द अजरामर आहेत. अमृता यांनी इमरोज यांच्यासाठी लिहिलेली कविता…
मैं तैनू फ़िर मिलांगी
कित्थे ? किस तरह पता नई
शायद तेरे ताखियल दी चिंगारी बण के
तेरे केनवास ते उतरांगी
जा खोरे तेरे केनवास दे उत्ते
इक रह्स्म्यी लकीर बण के
खामोश तैनू तक्दी रवांगी