मुंबई : शहरात पोलीस विभागाकडून लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीची नजर नेहमीच मुंबईवर असते (Mumbai CCTV). पण आता यात अजून भर पडणार आहे. मुंबईत अतिरिक्त 5,500 सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. यापैकी 500 सीसीटीव्ही हे मुंबई महापालिका बसवणार आहे. त्यामुळे मुंबईकर जर तुम्ही रस्त्यावर कचरा, डेब्रीज टाकत असाल तर सावधान, कारण तुमच्यावर आता महापालिकेच्या सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे (BMC CCTV).
मुंबई (Mumbai) शहर हे देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे सुरक्षेबाबत मुंबईत जास्त काळजी घेतली जाते. शहरात प्रत्येक चौकात लागलेले सीसीटीव्ही कॅमेरे यांना मुंबई पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून ओळखलं जातं. मुंबईच्या प्रत्येक चौकात, सार्वजनिक ठिकाणी, महत्त्वाच्या ठिकाणी लावलेले कॅमेरे सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईच्या पोलिसांना मोठी मदत करत आहेत. आता मुंबई महापालिकासुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे लावणार आहे.
इस्त्रायल आणि इतर देशांच्या धर्तीवर नव्यानं लावल्या जाणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये व्हिडीओ अॅनॅलिटिक्स टूलचा वापर केला जाणार आहे. या नव्या तंत्रामुळे, झाड कोसळणे, इमारत पडणे, पूरस्थिती निर्माण होणे, अवैधरित्या कचरा टाकणे, डेब्रीज टाकणे, चेंगराचेंगरीची परिस्थिती या बाबींवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
मुंबई पोलिसांकडून यापूर्वीच 5,000 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. आता मुंबई पोलिसांकडून अतिरीक्त 5,000 कॅमेरे लावले जातील. मुंबई सुरक्षित करण्यासोबतच मुंबई दूर्घटनामुक्त, कचरामुक्त करण्यासाठी हे सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात आहेत, अशी माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली.
पालिकेला या कॅमेऱ्यांमुळे झाड कोसळणे, इमारत पडणे, पूरस्थिती निर्माण होणे, अवैधरित्या कचरा, डेब्रीज टाकणे, चेंगराचेंगरीची परिस्थिती या बाबींवर विशेष लक्ष ठेवता येणार आहे. मुंबई महापालिकेने अशा प्रकारे 500 कॅमेरे लावणार असल्याने शहरात घडणाऱ्या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवता येणार आहे.