मुंबई : टीव्ही चॅनल्सकडून आपल्या चॅनलचा टीआरपी (TRP) वाढवण्यासाठी होत असलेल्या घोटाळ्याचा मुंबई पोलिसांनी मध्यंतरी भांडाफोड केला. त्यानंतर मुंबई पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. आता या टीआरपी घोटाळा प्रकरणी टीआरपी ठरवणाऱ्या बार्क (BARC) या संस्थेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यालाच अटक झाली आहे. पार्थो दासगुप्ता असं या अटक केलेल्या बार्कच्या माजी सीईओचं नाव आहे. मुंबई पोलीस दलातील सहआयुक्त मिलिंद भारांबे म्हणाले, पार्थो दासगुप्ता टीआरपी (टेलीविजन रेटिंग प्वाईंट्स) प्रकरणातील मास्टरमाईंड आहे. पार्थो दासगुप्ता 2013 ते 2019 या काळात BARC चा सीईओ होता (Mumbai Police arrest former CEO of BARC Partho Dasgupta in fake TRP case).
पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे म्हणाले, “टीआरपी घोटाळा प्रकरणाचा तपास करताना हा TRP घोटाळा 2016 पासून सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. पार्थो दासगुप्ता सीईओ पदावरुन बाजूला झाल्यानंतर BARC ने तटस्थ संस्थेकडून बार्कचं ऑडिट करण्यात आलं. या ऑडिटचा अहवाल जुलै 2020 मध्ये सादर करण्यात आला. या अहवालात 2016 ते 2019 या काळातील टीआरपी डाटात घोटाळा असल्याचं समोर आलं.
टीआरपी घोटाळा समोर आणणारा हा अहवाल जवळपास 44 आठवडे बार्कच्या डाटाचा अभ्यास करुन बनवण्यात आलाय. यात इंग्रजी चॅनलच्या स्पर्धेत टीआरपीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ‘टाईम्स नाऊ’ चॅनलला दुसऱ्या क्रमांकावर नेत रिपब्लिक टीव्हीला कशाप्रकारे क्रमांक 1 वर नेण्यात आलं याचे तपशील देण्यात आले आहेत. या अहवालात हेही स्पष्ट झालंय की संबंधित चॅनलला दिलं जाणारं रेटिंग आधीच निश्चित केलं जात होतं.
उत्तर प्रदेशातील टीआरपी केसची चौकशी सीबीआयकडे
दरम्यान, मुंबईत पोलिसांकडून टीआरपी घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक सत्र आणि चौकशी सुरु केलीय. यानंतर यावर देशभरात प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर उत्तर प्रदेशमध्ये देखील या प्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, नंतर लगेचच उत्तर प्रदेशमधील हे टीव्ही चॅनेलशी संबंधित बोगस टीआरपी घोटाळ्याचं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. उत्तर प्रदेशातील गोल्डन रॅबिट कम्युनिकेशन चालवणाऱ्या कमल शर्मा याने टीआरपी घोटाळ्यासंदर्भात तक्रार केली होती. उत्तर प्रदेश पोलिसांनी टीआरपी प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने तात्काळ यूपीतील टीआरपी घोटाळ्यासंदर्भातील केस सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता.
उत्तर प्रदेश पोलिसांकडे 17 ऑक्टोबरला टीआरपी घोटाळ्यासंदर्भात एक केस दाखल झाली होती. हजरतगंजमधील कमल शर्मा या व्यक्तीने यासंदर्भात तक्रार नोंदवली होती. त्याने केलेल्या तक्रारीत कोणत्याही चॅनेलचे नाव घेण्यात आलेले नाही. सर्व चॅनेलसची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शर्माने केली आहे.
मुंबई पोलिसांकडूनही बोगस टीआरपी प्रकरणी चौकशी सुरू
मुंबई पोलिसांनी 6 ऑक्टोबरला बोगस टीआरपी प्रकरणी एफआयआर नोंदवली होती. मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत हे प्रकरण उघडकीस आणले होते. या दरम्यान रिपब्लिक टीव्ही सह इतर दोन मराठी चॅनेलच्या नावाचा उल्लेख पोलिसांनी केला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी काही जणांना अटक केली असून चौकशी सुरू आहे.
बोगस टीआरपी प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी देखील करण्यात आली होती. यानंतर रिपब्लिक टीव्हीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांना मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यास सांगण्यात आले होते. रिपब्लिक टीव्हीचे वकील हरिश साळवे यांनी हे प्रकरण सीबीआयला सोपवण्याची केलेली मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
मुंबई उच्च नायालयाचा टीआरपी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यास नकार
दरम्यान, टीआरपी प्रकरणात मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा किंवा हा गुन्हा तपासासाठी सीबीआय कडे वर्ग करावा, अशी मागणी करणारी याचिका पत्रकार अर्णव गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, हा गुन्हा रद्द करता येणार नाही, त्याचप्रमाणे सीबीआयकडे ही वर्ग करण्याची आवश्यकता नाही, असं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं. तसेच, मुंबई पोलीस तपास करत आहेत. त्या तपासात तुम्ही सहकार्य करावे, असे आदेशही न्यायालयाने अर्णव गोस्वामी यांना दिले होते.
संबंधित बातम्या :
TRP Scam | रिपब्लिक चॅनलचे सीईओ विकास खानचंदानीला अटक, टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांची कारवाई
‘रिपब्लिक टीव्ही’च्या अर्णव गोस्वामी यांना अटक
TRP Scam | टीआरपी घोटाळाप्रकरणी आणखी एकाला अटक, आतापर्यंत 11 जण गजाआड
Mumbai Police arrest former CEO of BARC Partho Dasgupta in fake TRP case