मुंबई : दादरमध्ये शिंदेवाडी भागात पोलिसाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची थरारक घटना समोर आली आहे. चार मजली इमारतीच्या निमुळत्या कठड्यावर संबंधित पोलीस हवालदार येरझाऱ्या घालत होता. तब्बल चार तास हे थरारनाट्य चालले, अखेर वरिष्ठ पोलिसांनी आटोकाट प्रयत्न करुन विनवणी केल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचारी आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त झाला. (Mumbai Police Constable attempts Suicide at Dadar Shindewadi Building)
मुंबईतील दादरमध्ये शिंदेवाडी भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर असलेल्या चारमजली इमारतीत हा प्रकार घडला. शनिवारी सकाळी 10-11 वाजताच्या सुमारास संबंधित 29 वर्षीय पोलीस हवालदार इमारतीच्या कठड्यावर उभा असल्याचं काही जणांच्या निदर्शनास आलं. त्यांनी हटकूनही तो मागे न फिरल्याने परिस्थितीचं गांभीर्य इतरांना लक्षात आलं.
LIVETV – दादरमध्ये थरार, शिंदेवाडीतील चार मजली इमारतीवरुन पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न, तब्बल चार तासांनी समजूत काढण्यात वरिष्ठ पोलिसांना यश https://t.co/ImprYhMJl7 @dineshdukhande pic.twitter.com/vVF3BLMG8s
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 13, 2020
पोलीस हवालदाराची समजूत काढण्याचा आटोकाट प्रयत्न वरिष्ठ अधिकारी, इमारतीतील रहिवासी करत होते. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हते.
संबंधित 29 वर्षीय पोलीस हवालदार यावेळी रडत होता. तो कोणत्यातरी मानसिक दबावाखाली असल्याचं म्हटलं जात आहे. त्याने आपलं पाकीट कठड्यावर ठेवलं होतं. तर बॅगमध्ये असलेल्या कागदपत्रांवरुन त्याची ओळख पटली.
पोलिसांनी नंबर शोधून त्याचा गावी संपर्क करुन दिला. कुटुंबाशी फोनद्वारे बातचीत करुन दिली गेली. “तुला कोणीही काही बोलणार नाही, तू आत ये” अशी विनवणी घरच्यांनी केली. अखेर काही वेळाने हवालदार आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त झाला.
तब्बल चार तासांनी त्याची समजूत काढण्यात अग्निशमन दलाचे जवान आणि वरिष्ठ पोलिसांना यश आले. तो कठड्यावरुन गच्चीच्या आतील भागात उडी मारुन आला. लगेच पोलिसांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत इमारतीखाली आणले.
#मुंबई : दादरमध्ये इमारतीच्या कठड्यावरुन पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न, वरिष्ठांच्या विनवणीने चार तासांच्या थरारनाट्यावर पडदा pic.twitter.com/M2HhadWqSE
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 13, 2020