मुंबई : मुंबईसह राज्यभरातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा वाढतच आहे. राज्यातील आणखी 114 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या तब्बल 2325 वर पोहोचली आहे. दुर्दैवाने एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, हा आकडा आता 26 वर पोहोचला आहे. (constable Deepak Hate dies after Hours being discharged)
धक्कादायक म्हणजे पोलीस हवालदार दीपक हाटे यांचंही कोरोनाच्या उपचारानंतर निधन झालं आहे. दीपक हाटे यांच्यावर कोरोनाबाबत उपचार सुरु होते. उपचार घेऊन घरी आल्यानंतर अवघ्या चार तासात त्यांचं निधन झालं. कोरोनावर उपचार घेऊन घरी परतल्यानंतर अवघ्या चार तासात दीपक हाटे यांनी प्राण सोडल्याने, मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
इंडियन एक्प्रेसच्या बातमीनुसार, 53 वर्षीय दीपक हाटे हे वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. अडकलेल्या मजुरांना गावी पाठवण्यासाठी ज्या पोलिसांची ड्युटी होती, त्यामध्ये दीपक हाटे यांचाही समावेश होता. यानंतर काहीच दिवसात दीपक हाटे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. दीपक हाटे आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांना वरळीतील राष्ट्रीय क्रीडा अकादमी कोव्हिड सेंटरमध्ये हलवण्यात आलं.
गुरुवारी रात्री 8.15 च्या सुमारास हाटे हे वरळी पोलीस कॅम्पातील त्यांच्या घरी चालतच परतले. मात्र ते चालत कसे काय आले असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला. “हाटे यांची प्रकृती काहीशी ठिक नव्हती. तरीही त्यांना एका गाडीतून घरापासून लांब 1 किमीवर सोडलं. तिथून ते चालतच घरापर्यंत आले”, असं स्थानिकांनी सांगितलं.
दरम्यान, हाटे हे घरी परतल्याने शेजाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. हाटे यांनीही सर्वांना हात जोडून नमस्कार केला आणि पहिल्या मजल्यावरील त्यांच्या घरी गेले. मात्र रात्री 1 च्या सुमारास हाटे यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना रुग्णवाहिकेने नायर रुग्णालयात नेण्यात आलं. दरम्यान तोपर्यंत त्यांनी प्राण सोडले होते.
NSCI डोमच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हाटे यांना खोकला झाल्याने त्यांना अॅडमिट करण्यात आलं होतं. मात्र दररोज त्यांची तपासणी केली जात होती. गुरुवारी डिस्चार्ज देण्यापूर्वी त्यांची तपासणी केली होती. आम्ही सर्व नियम पाळले. आम्ही बेस्ट बसचं नियोजन केलं होतं, मात्र त्यांना स्वत:च्या बाईकने घरी जायचं होतं”
मुंबई महापालिकेच्या डिस्चार्जच्या नियमानुसार, जर रुग्णाला लक्षणे नसतील तर त्याला दहा दिवसांनी कोरोना चाचणीशिवाय डिस्चार्ज दिला जातो. याप्रकरणातही कोरोना चाचणी आवश्यक नव्हती. हाटे यांची नाडी, ऑक्सिजन पातळी आणि तापमान पुन्हा तपासूनच त्यांना डिस्चार्ज दिला होता. घरी जाण्यासाठी ते आनंदी होते, असंही डॉक्टरांनी सांगितलं.
पण एव्हढं सर्व केल्यानंतरही हाटे यांचं निधन नेमकं कशामुळे झालं? त्यांना नेमका कोणता त्रास झाला? याचा तपास आता सुरु आहे.
(constable Deepak Hate dies after Hours being discharged)