मुंबई: राज्यातील मराठा आंदोलकांनी मुंबईत आंदोलन (Maratha Morcha) करण्याचा इशारा दिल्यानंतर आता पोलिसांकडून सुरक्षेत कमालीची वाढ करण्यात आली आहे. मुंबईच्या वेशीवर पोलिसांकडून प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. (Mumbai Police increase security checking vehicles on Toll plaza)
सोमवारी सकाळी मुलुंड टोलनाक्यावर पोलिसांनी भगवा झेंडा लावलेल्या एका बसला अडवले. मात्र, या बसमध्ये सामान्य कर्मचारी होते. ही बस सरकारी कर्मचाऱ्यांना घेऊन मुंबईकडे येत होती. याची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी बसवरील भगवा झेंडा खाली उतरावयाला लावला आणि त्यानंतर बस सोडून दिली.
प्राथमिक माहितीनुसार, यावेळी पोलिसांनी बसमधील सर्व प्रवाशांची तपासणी केली. त्यांच्याकडील तिकीटेही तपासण्यात आली. मात्र, पोलिसांनी बसवरील भगवा झेंडा खाली उतरवल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
आजपासून मुंबईत दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. ही वेळ साधून मराठा आंदोलकांकडून मुंबईत आंदोलन केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून पोलिसांना चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईच्या वेशीवर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. कसून तपासणी केल्यानंतरच प्रत्येक वाहन पुढे सोडले जात आहे.
पंढरपुरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामाभाऊ गायकवाड यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याची माहिती आहे. काल रात्रीपासूनच गायकवाड यांच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
पोलिसांकडून सुरु असलेल्या तपासणीमुळे वाशीकडून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाशी टोलनाक्याच्या परिसरात जवळपास 4 किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
मराठा आंदोलक गनिमी काव्याने मंत्रालयात धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे.
रायगडमध्येही मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक्स्प्रेस वेवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. महामार्ग वाहतूक पोलीस, जिल्हा मुख्यालय अतिरिक्त पोलीस दल , खोपोली व खलापूर पोलीस, जिल्हा वाहतूक पोलीस खालापूर टोल नाक्यावर उपस्थित आहेत.
राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण, कोरोना ते शेतकरी अशा अनेक मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करु शकतात. तत्पूर्वी काल झालेल्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदेत ‘आणीबाणी’चा मुद्दा चांगलाच गाजताना पाहायला मिळाला.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. दोन दिवसाच्या अधिवेशनात काय होणार आहे? मागच्या अधिवेशनाप्रमाणे यावेळीही सत्ताधारी गोंधळ घालून चर्चा न करता विधेयकं मंजूर करतील, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल लगावला होता.
(Mumbai Police increase security checking vehicles on Toll plaza)