मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्ला होणार होता. याबाबतची माहिती पोलिसांना होती. तसेच सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (vishwas nangre patil) यांनाही याची माहिती दिली होती, अशी धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांच्या विशेष शाखेचं याबाबतचं पत्रं टीव्ही9च्या हाती लागलं आहे. त्यामुळे पोलिसांनी हा हल्ला का रोखला नाही? असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे. सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्याची माहिती मीडियाला होती. मात्र, पोलिसांना (police) हल्ल्याची माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे विरोधकांनी पोलिसांना या हल्ल्याची माहिती का मिळाली नाही? असा सवाल करेला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हाच सवाल केला होता. त्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील चांगलेच अडचणीत आले होते. त्यानंतर आता हे पत्रं बाहेर आल्याने सिल्व्हर ओकवर हल्ला होणार असल्याचं पोलिसांना माहीत होतं असं उघड झालं आहे.
दिनांक 4 एप्रिल रोजीचं हे पत्रं आहे. एसटी कर्मचारी अधिक आक्रमक होऊन आंदोलन करणार असल्याचं या पत्रात म्हटलं आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी 10 नोव्हेंबर 2021पासून आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात 10 नोव्हेंबर 2021 ते 24 नोव्हेंबर 2021 पर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021पर्यंत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करणअयात आले. त्यानंतनर इतर नेत्यांच्या मार्गदर्शनात आंदोलन सुरू आहे. 5 एप्रिल 2022 रोजी न्यायालयाचा निकाल येणार असल्याने 1500 ते 1600 तरुण येऊन जाऊन आहेत. आंदोलनस्थळी आंदोलकांची संख्या वाढत आहे. विलीनिकरणाचा निर्णय आपल्या विरोधात जाण्याची जाणीव त्यांना झाली आहे, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी 4 एप्रिल 2022 रोजी मंत्रालय आणि दिनांक 5 एप्रिल रोजी सिल्व्हर ओक, मातोश्री या ठिकाणी आंदोलन करण्याचा धमकीवजा इशारा दिला आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एसटी कर्मचारी खासगी वाहनाने किंवा एसटीने येण्याची शक्यता आहे. खासगी वाहनाने मुलुंड चेक नाका आणि दहिसर नाका येथून प्रवेश करणार आहेत. या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी विनंती आहे, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
आंदोलक त्यांच्या मागण्यांवर ठाम असल्याने आझाद मैदान, मंत्रालय, मातोश्री, सह्याद्री अतिथी गृह, सिल्व्हर ओक, परिवहन मंत्र्यांचं शासकीय निवासस्थान आदी ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं या पत्रात स्पष्टपणे म्हटलं आहे. त्यामुळे हल्ल्याची माहिती असूनही पोलिसांनी या माहितीकडे दुर्लक्ष केलं का? असा सवाल केला जात आहे.
संबंधित बातम्या:
Sanjay Raut: कुठे आहेत दोन ठग?, सोमय्या देशाबाहेर पळून जाऊ शकतात; राऊतांना शंका