मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगातील गुंडांना फोन जातात? संजय राऊत यांच्या आरोपांनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

| Updated on: Jul 15, 2023 | 10:09 PM

खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांची दखल मुंबई पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी या आरोपांची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगातील गुंडांना फोन जातात? संजय राऊत यांच्या आरोपांनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून तुरुंगातील गुंडांना फोन केला जातो. कैद्यांशी डिलिंग केली जाते”, असा गंभीर आरोप राऊतांनी केला. विशेष म्हणजे राऊत यावरच थांबले नाहीत तर त्यांनी यापेक्षाही गंभीर आरोप केले. “मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात अंडरवर्ल्डची टोळी चालवली जाते”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच आपण या आरोपांचे पुरावे देखील समोर आणणार, असं राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत यांच्या या आरोपांनंतर आता मुंबई पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर आता पोलिसांकडून या आरोपांची पडताळणी केली जाणार आहे. राऊत यांनी मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगातील गुंडांना फोन जातात, असा आरोप केला होता. पोलिसांकडून संजय राऊत यांचाही जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून आरोपांमधील तथ्यता पडताळून कारवाई केली जाणार आहे.

संजय राऊत यांना पोलिसांची नोटीस

विशेष म्हणजे संजय राऊत यांना पोलिसांनी आजच नोटीस पाठवली आहे. पोलिसांनी संजय राऊत यांच्याकडे केलेल्या आरोपांच्या संबंधित काय पुरावे आहेत, त्यावर स्पष्टीकरण मागवलं आहे. गुन्हे शाखेकडून याबाबतची नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसमधून राऊत यांना चौकशीला बोलावण्यात आलेलं नाही. मात्र आरोपांसंदर्भात काय माहिती आहे ती मागवण्यात आलीय.

संजय राऊत यांचे आरोप काय?

“मुख्यमंत्री कार्यालयातून महाराष्ट्रातील अनेक तुरुंगातल्या भयंकर गुन्हेगारांशी संपर्क साधला जातोय. का? काही लोकांनी जामीन देवून निवडणुकीआधी बाहेर काढण्याचं षडयंत्र आहे. कोणाच्या विरोधात? मी तुम्हाला लवकरच याचे पुरावे देईन. अगदी मुंबईपासून नाशिकपर्यंत, कोल्हापूर, जिथे जिथे तुरुंगात कलम 302 गुन्ह्यातील म्हणजे खूनाचे आरोपी आहेत त्या सगळ्यांना यांची माणसं जावून भेटत आहेत. संपर्क करत आहेत. त्यांना जामीनावर बाहेर काढण्यासंदर्भात, गुन्हेगारांबरोबर डिलिंग सुरु आहे”, असा धक्कादायक आरोप संजय राऊत यांनी केला.

“गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतात? उत्तर द्या. तुम्हाला यावर राग यायला पाहिजे. आपण या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात, या महाराष्ट्राच्या प्रतिमेची तुम्हाला चिंता असेल, हे जे आम्ही सांगत आहोत, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, राजकारण नंतर, आम्ही काय सांगतोय ते समजून घ्या. नुसते हात उडवू नका”, असं संजय राऊत म्हणाले.

“आपण घटनात्मक पदावर बसले आहात मिस्टर फडणवीस. तुम्ही आमचं काय वाकडं करायचं ते केलं आहे. अजून करा. काय करणार? तुमच्या हातात यंत्रणा आहे म्हणून तुम्ही तरावलेले आहेत. आमनेसामने लढा. समोर लढा. आम्ही जे सांगतोय ते महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राचा कलंक पुसला जावा म्हणून सांगतोय”, असंही राऊत म्हणाले.

“तुमच्या गृह खात्याच्या नाकावर टिचून काय चाललंय? हे लवकरच उघड करतो. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून कसे फोन जात आहेत? कुणाला कुठे भेटायला पाठवलं जातंय? कुठे बैठका होतायत? अगदी तुरुंगाच्या दारात आतामध्ये, आतमध्ये फोन आहेत. गृह मंत्र्यांना मुख्यमंत्री कार्यालायवर लक्ष ठेवायला सांगा, मग कळेल की, मुख्यमंत्री कार्यालयातून कशी अंडरवर्ल्डची टोळी चाललेली आहे. माझ्याकडे सगळी माहिती”, असा दावा संजय राऊत यांनी केला.