Maratha protesters at Matoshree : शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट करावी, यासाठी मराठा कार्यकर्त्यांकडून आज मातोश्रीबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईतील खेरवाडी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याबाहेर जमाव अथवा आंदोलन करु नका, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
मराठा समाजाचे कार्यकर्ते आज मातोश्रीबाहेर आंदोलन करणार आहेत. काल उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाच्या आंदोलकांना भेट दिली नव्हती. त्यामुळे मराठा समाजाने आक्रमक पावित्रा घेतला आहे. मराठा समाजाचे 150 ते 200 कार्यकर्ते आज मातोश्रीबाहेर आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मातोश्रीबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्याबद्दलच्या मागणीबद्दल उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक हे काल मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी भेट घेणार होते. मात्र ही भेट न झाल्याने आता कार्यकर्त्यांनी मातोश्रीसमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
याप्रकरणी आता मुंबईतील खेरवाडी पोलिसांकडून मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आले आहे. मातोश्रीबाहेर कोणताही जमाव किंवा आंदोलन करु नका, अशी नोटीस पोलिसांनी दिली आहे. आपण मातोश्री बंगला याठिकाणी कोणतेही आंदोलन करू नये, असे पोलिसांनी यात म्हटले आहे.
आपण किंवा आपले समर्थक/कार्यकर्ते यांच्याकडून अशी कोणतीही कृती घडल्यास, त्यायोगे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास अथवा सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण झाल्यास त्याबाबत आपणास जबाबदार धरले जाईल. तसेच याविरुद्ध कायदयान्वये ठोस कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या नोटीसचा वापर आपल्या विरुद्ध पुरावा म्हणून करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक यांनी म्हटले आहे.