मुंबईः धार्मिक, जातीय पोस्ट टाकून सामाजिक वातावरणात अंसतोष आणि कलह निर्माण करण्याचे मनसुबे आखणाऱ्यांनी सावध रहावे. अनेकदा काही जण सहज गंमत म्हणूनही अशा पोस्ट पुढे फॉरवर्ड करतात. त्यांनीही सावध रहावे. कारण तुमची समाजातली धुलाई तर सोडाच, आता याप्रकरणी स्वतः पोलिसही (Police) तुमच्या घरी येऊन यथासांग न बोलावता पाहुणचार करू शकतात. कारण राज्यातील जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी आता मुंबई (Mumbai) पोलीस सक्रिय झालेत. त्यांनी एक सोशल मीडिया (Social Media) लॅब यासाठी सुरू केलीय. त्यामार्फत आतापर्यत 3000 पोस्ट हटवण्यात आल्या आहेत. यापुढे पोलीस फक्त गप्प बसून पोस्ट हटवतील असे नव्हे, तर त्यांच्या खाक्यालाही तुम्हाला सामोरे जाऊ शकते, हेच त्यांनी दाखवून दिले आहे. कारण या प्रकरणात आतापर्यंत 61 जणांना अटक करण्यात आली आहे. हे टाळायचे असेल, तर कुठलिही पोस्ट टाकताना अगदी तीनदा तरी जरूर विचार करा. अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
अनेकदा धार्मिक आणि जातीय पोस्ट केली जाते. त्यावरून सामाजिक वातावरण गढूळ होते. व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्वीटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडतो. अशा पोस्टला आपण कळत आणि नकळत लाइक करतो. ज्या पोस्टमुळे दोन समाजात, धर्मात तेढ निर्माण होते याप्रकरणी कठोर कारवाई होते. अशी पोस्ट टाकणाऱ्या आणि पसरवणाऱ्याविरोधात भारतीय दंडसंहिता कायद्यानुसार 153, 153 अ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येतो. या गुन्ह्यात तीन वर्षे कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.
Maharashtra | ‘Social Media Lab’ activated to keep a vigil on the posts that could incite communal tensions in the state. Till now, 3000 such posts have been deleted: Mumbai Police
— ANI (@ANI) April 18, 2022
धार्मिक आणि जातीय पोस्ट टाकल्यानंतर अनेक तरुण मोठ्या उत्साहात त्या फिरवतात. त्यांना लाइक करतात. त्यावर आपली प्रतिक्रिया मांडतात. मात्र, ते सुद्धा यामुळे अडचणीत येऊ शकतात. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला, तर चारित्र्य पडताळणीचा दाखला, पासपोर्ट काढण्यात मोठ्या अडचणी उदभवतात. अशा नसत्या उठाठेवीमुळे सामाजिक वातावरण तर खराब होतेच, पण अनेकांचे करिअर सुद्धा उद्धवस्त होऊ शकते. सरकारी आणि इतर ठिकाणी नोकरी लागताना अडचण उदभवू शकते. त्यामुळे जरा जपून. हातात मोबाइल आहे म्हणून सुसाट सुटू नका, इतकेच.