मुंबई पूल दुर्घटना: बेल्टवाला जाहीद, नर्स रंजना, भक्ती आणि अपूर्वाचा दोष काय होता?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ पादचारी पूल कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला. काल रात्री साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.  मृत्यू कुठं आणि कसा गाठेल, हे कोणालाही नेमकं सांगता येणार नाही. ड्युटीवर निघालेल्या रंजना तांबे, भक्ती शिंदे आणि अपूर्वा प्रभू असो किंवा बाजारहाट करण्यासाठी घाटकोपरमधून सीएसटीला आपल्या वडिलांसोबत आलेला जाहीद खान असो, यांना अचानक मृत्यूनं गाठलं, […]

मुंबई पूल दुर्घटना: बेल्टवाला जाहीद, नर्स रंजना, भक्ती आणि अपूर्वाचा दोष काय होता?
Follow us on

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ पादचारी पूल कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला. काल रात्री साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.  मृत्यू कुठं आणि कसा गाठेल, हे कोणालाही नेमकं सांगता येणार नाही. ड्युटीवर निघालेल्या रंजना तांबे, भक्ती शिंदे आणि अपूर्वा प्रभू असो किंवा बाजारहाट करण्यासाठी घाटकोपरमधून सीएसटीला आपल्या वडिलांसोबत आलेला जाहीद खान असो, यांना अचानक मृत्यूनं गाठलं, काय दोष होता? पुलाखालून चालणं हा त्यांचा गुन्हा होता का ? त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न मुंबईत ठराविक काळाने उपस्थित होतात.

रात्रीचे साडे सात वाजत आले होते. प्रवाशांची लगबग सुरु होती. त्यांना घरी जाण्यासाठी त्यांची नेहमीची ट्रेन पकडायची होती. तर काही जण कामानिमित्त क्रॉफर्ड मार्केटला आले होते. या धावपळीपैकी एक होती रंजना तांबे, ती जी टी हॉस्पिटलमध्ये परिचारिका होती. नाईटशिफ्टसाठी कामावर जात असताना अचानक पूल कोसळला. पुलाचे पिलर पडून रंजनाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मोहन मिद्दा काळबादेवीमध्ये सोनार काम करतो. तो आपल्या मुलाचं उपचारासाठी गावी चाललं होता. सीएसटीएमवरून 8.35 ची हावडा मेल गाडी पकडायची होती. पण दुर्दैवाने ब्रिज कोसळला. मोहनला स्टेशन सोडण्यासाठी अभिजीत मन्ना आणि राजेश दास हे दोन मित्र सोबत होते. मोहन मूळचा पश्चिम बंगाल मेदनीपुर दासपुर इथला रहिवासी आहे, तो त्याच्या मुलाच्या पायावरील आजारमुळे तो ऑपरेशनसाठी गावी निघाला होता. पण दुर्दैवाने त्याच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली. मोहनला डोक्यावर मार लागला आहे तर राजेशचा हात आणि अभिजीतचा एक पाय तुटलाय.

सेंट जॉर्ज रुग्णालयात एकूण 17 जखमी लोक उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यात एक आहे मोहम्मद अतहर खान. अतहर इलेक्ट्रिशियन आहे. अतहर GT रुग्णालयात अडमिट असलेल्या त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी जात होता.

सुजॉय वेरा उर्फ माजी हा नेहमीप्रमाणे आपलं काम संपवून काळबादेवीमधून कल्याणला आपल्या घरी निघाला होता आणि सव्वा सात वाजता जेव्हा तो टाईम्स ऑफ इंडियाची बिल्डिंग समोर फुट ओवर ब्रिज क्रॉस करत होता, तेव्हाच ब्रिज कोळसला आणि सुजॉय वेराला गंभीर दुखापत झाली.

जाहिद खान आणि त्याचे वडील सिराज खान हे घाटकोपरमध्ये राहतात, जाहिद यांचं बेल्टचे दुकान आहे आणि तो आपल्या वडिलांबरोबर बाजारहाट करण्यासाठी सीएसटीकडे आले होते. दरम्यान या पुलावरून जाताना पुलासोबत दोघे बाप बेटे खाली कोसळले, यात जाहिद यांचा मृत्यू झाला तर वडील जखमी झाले.

वडिलांनी मुलाला स्वतः सेंट जॉर्ज रुग्णालयात नेलं पण जाहिदचा मृत्यू झाला होता, सध्या जाहिदचे वडील बोलण्याच्या परिस्थितीत नाहीत, पण भाऊ कलाम खान यांनी या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल प्रशासनाला केला आहे.

अशी प्रत्येकाची कहाणी आहे. काही ना काही कारणानिमित्त जखमी आणि मृत व्यक्ती पुलाजवळ आल्या होता. हे सर्व जखमी प्रशासनाच्या बेपर्वाईचे बळी ठरलेत हे मात्र निश्चित.