Mumbai Porsche Car Accident : गेल्या काही महिन्यांपासून मुंबईसह महाराष्ट्रात अपघाताचे प्रकरण सातत्याने वाढत आहे. त्यातच आता मुंबईत एक भीषण अपघात झाला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. त्यातच आता मुंबईतील वांद्रे परिसरात एका पोर्शे कारचा अपघात झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ही कार मुंबईतील बड्या उद्योगपतीचा 19 वर्षीय मुलगा चालवत होता. ध्रुव नलिन गुप्ता असं त्याचं नाव असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील उच्चभ्रू वस्ती असलेल्या वांद्रे परिसरातील साधू वासवानी चौकात एक भीषण अपघात घडला. शनिवारी पहाटे एका भरधाव पोर्शे गाडीने फूटपाथजवळ उभ्या असलेल्या दुचाकींना धडक दिली. यावेळी ही पोर्शे कार 19 वर्षीय ध्रुव गुप्ता चालवत होता. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे.
या व्हिडीओत पहाटेच्या सुमारास पोर्शे कार ही भरधाव वेगात साधू वासवानी चौकातून जाताना दिसत आहे. अचानक ही कार नियंत्रणाबाहेर गेली आणि ती रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या काही दुचाकींना धडकली. ही धडक इतकी जबरदस्त होती की काही दुचाकींचा चक्काचूर झाला. सुदैवाने ही कार झाडावर आदळ्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातात कुणीही जखमी झालं नाही. या गाडीत चार जण होते. ही गाडी 19 वर्षीय ध्रुव गुप्ता चालवत होता. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र आणि एक मैत्रीणही याच गाडीतून प्रवास करत होते.
या अपघातानंतर गाडीत बसलेली तरुणी काचेतून एक बाटली बाहेर फेकतानाचे दृश्यही सीसीटीव्हीत कैद झाले. त्या तरुणीने फेकलेली ती बाटली दारुची होती का? पुरावे नष्ट करण्यासाठी असे करण्यात आले का? असे प्रश्न उपस्थितीत होत आहेत. तसेच या गाडीत बसलेले सर्वजण नशेत होते का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या ध्रुव गुप्ताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्या रक्ताचे नमुनेही घेण्यात आले आहेत. ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याचा अहवाल आल्यानंतर याबद्दलची संपूर्ण माहिती समोर येणार आहे.
अंबरनाथमध्येही भीषण अपघात झाला. अंबरनाथमध्ये 2 दुचाकींच्या अपघातात 4 जण जखमी झाले आहेत. या दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहे. अंबरनाथच्या कानसई एएमपी गेट परिसरात राहणारे दादाभाऊ हटकर हे त्यांचा मुलगा राज हटकर याच्यासोबत रिलायन्स पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून घराकडे निघाले होते. एएमपी गेटच्या रस्त्याकडे वळतानाच मागून येत असलेल्या दुचाकीवरील मेहफुज शहा आणि निलेश विश्वकर्मा यांची त्यांना जोरदार धडक बसली.
यात हे चौघेही जखमी झाले. यापैकी निलेश विश्वकर्मा आणि राज हटकर हे दोघे गंभीर जखमी झाले. यांना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर राज हटकर आणि निलेश विश्वकर्मा या दोघांना कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवण्यात आलं. दादाभाऊ हटकर यांनी उजवीकडे वळताना कोणताही सिग्नल न देता अचानक वळण घेतल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा मेहफूज शहा यांनी केला आहे. तर हटकर यांनी हा अपघात कसा झाला हे समजलंच नाही, असं सांगितलं आहे.