Mumbai Prabhadevi Big Pothole : मुंबईतील प्रभादेवी परिसरातील एका रस्त्याला मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात एक गाडी अडकल्याचेही पाहायला मिळत आहे. प्रभादेवी परिसरातील हार रस्ता मध्येच खचल्याने मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे रस्ते बांधकामावर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
गेल्या काही दिवसांपासून रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा दावा सर्वसामान्य नागरिकांकडून केला जात आहे. त्यातच आता मुंबईत एक मोठी दुर्घटना टळली आहे. मुंबईतील प्रभादेवी परिसरात असलेल्या एका रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. यामुळे परिसरात सध्या गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
प्रभादेवी परिसरात खचलेल्या या रस्त्यात एक गाडी अडकल्याचे पाहायला मिळत आहे. या कारचा पुढचा टायर या खड्ड्यात अडकला. त्यामुळे या परिसरात मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. तसेच रस्त्यावर खड्डा पडलाय हे समजताच आजूबाजूला असलेल्या अनेकांनी तो पाहण्यासाठी गर्दी केली.
मुंबईतील प्रभादेवी परिसरात असलेला हा रस्ता सिद्धीविनायक मंदिराकडे जातो. सध्या गणेशोत्सवाचे दिवस सुरु आहेत. या काळात मोठ्या प्रमाणात भाविक सिद्धीविनायक दर्शनासाठी येत असतात. त्यासोबतच या परिसरात अनेक कॉर्पोरेट ऑफिस देखील आहेत. त्यातच आता या रस्त्याला खड्डा पडल्याने मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणार आहे.