राम मंदिराचं उद्घाटन हा तर…; बाबासाहेबांचे विचार सांगत प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर निशाणा

| Updated on: Jan 18, 2024 | 11:57 AM

Prakash Ambedkar on Ram Mandir Inauguration 2024 and Babasaheb Ambedkar Thought : राम मंदिराच्या उद्घाटनाचं आमंत्रण मिळालं पण प्रकाश आंबेडकर जाणार का? प्रकाश आंबेडकर यांची भाजपवर टीका, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय? वाचा सविस्तर..

राम मंदिराचं उद्घाटन हा तर...; बाबासाहेबांचे विचार सांगत प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर निशाणा
Follow us on

मुंबई | 18 जानेवारी 2024 : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाला वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र आपण या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा दाखला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या राजकीय फायद्यासाठी धार्मिक कार्यक्रमाचा वापर करत असल्याचा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांचं ट्विट

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मला मिळाले. मी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही कारण हा कार्यक्रम भाजप-आरएसएसने मंजूर केला आहे; धार्मिक कार्यक्रम म्हणजे निवडणूक फायद्यासाठी राजकीय मोहीम बनली आहे. माझे आजोबा डॉ. बी.आर. आंबेडकर यांनी चेतावणी दिली की, “पक्षांनी पंथाला देशापेक्षा जास्त स्थान दिले तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल आणि कदाचित कायमचे गमावले जाईल.” माझ्या आजोबांची भीती आज खरी झाली आहे. “देशावर पंथ ठेवणाऱ्या” भाजप-आरएसएसने आपल्या राजकीय फायद्यासाठी धार्मिक कार्यक्रमाचा वापर केला आहे. जय फुले. जय सावित्री. जय शाहू. जय भीम.

राम मंदिराचं उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण

येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित केलं गेलं आहे. यात राजकीय पक्षांचाही समावेश आहे. काँग्रेस पक्षालाही राम मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र राम मंदिराचं उद्घाटन हा भाजपचा कार्यक्रम असल्याचं म्हणत काँग्रेसने या कार्यक्रमाला उपस्थित राहणं टाळलं आहे. काँग्रेस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं आहे. मात्र शरद पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत, राम मंदिराचं काम पूर्ण झालं की, आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहू, असं शरद पवारांनी सांगितलं आहे. आता प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र आंबेडकरांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तसं ट्विट आंबेडकरांनी केलं आहे.