मुंबई, पुण्यातील धरणांची स्थिती काय? किती पाणीसाठा जमा? जाणून घ्या A टू Z माहिती

| Updated on: Jul 25, 2024 | 8:32 AM

मुंबई, पुण्याला वर्षभर पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रातही चांगला पाऊस होताना दिसत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईसह पुण्यातील अनेक धरणात 50 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला आहे.

मुंबई, पुण्यातील धरणांची स्थिती काय? किती पाणीसाठा जमा? जाणून घ्या A टू Z माहिती
Follow us on

Mumbai Pune Water Shortage : सध्या मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात जोरदार पाऊस होत आहे. यामुळे अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. तर दुसरीकडे मुंबई, पुण्याला वर्षभर पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रातही चांगला पाऊस होताना दिसत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईसह पुण्यातील अनेक धरणात 50 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई शहरासह उपनगराला सात धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईतील सात धरणात निम्म्याहून अधिक म्हणजे जवळपास 53.12 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सोमवारी 22 जुलैला पडलेल्या पावसामुळे एकाच दिवसात 21 दिवस पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

तानसा धरण ओव्हरफ्लो

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यासोबतच तुळशी तलावही काठोकाठ भरला आहे. तसेच सर्वात मोठे भातसा धरण 52 टक्के भरल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यासोबतच मुंबईतील सातही जलाशयांमध्ये निम्म्याहून अधिक (53.12 टक्के) पाणीसाठा जमा झाला. हा पाणीसाठा मुंबई, ठाणे, भिवंडी, निजामपूर आणि मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पुढील 192 दिवस म्हणजेच 2 मार्च 2025 पर्यंत पुरेल इतका आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाची सद्यस्थिती

  • अप्पर वैतरणा- १८.४३ %
  • मोडक सागर- ७५.४६ %
  • तानसा- १०० %
  • मध्य वैतरणा- ४७.०३ %
  • भातसा- ५२.०७ %
  • विहार- ८८.४० %
  • तुळशी – १०० %

पाणीकपात रद्द होण्याची शक्यता

मुंबईत सध्या सुरु असलेला पाऊस आणि धरण क्षेत्रात वाढणारा पाणीसाठा यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मुंबईतील 10 टक्के पाणीकपात रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील पाणीकपात रद्द करण्याबाबत आयुक्तांकडे जल विभागाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत मुंबईतील पाणीकपात रद्द करण्याबद्दलचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईसह पुण्यातही मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. पुणे जिल्हा आणि धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुण्यातील खडकवासला हे धरण 100 टक्के भरले आहे. तर पानशेत, वरसगाव, टेमघर ही धरणे 70 टक्के भरली आहेत. सध्या खडकवासला धरणातून ३५ हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा प्रवाह सुरु आहे. तर इतर चार धरणात जवळपास २०.२७ टीएमसी पाणीसाठा आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाची सद्यस्थिती

  • खडकवासला – १०० टक्के
  • टेमघर – ५७ टक्के
  • वरसगाव – ६३ टक्के
  • पानशेत – ७६ टक्के

पुण्यासह पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ तालुक्याची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. पिंपरीत गेल्या 12 तासांत तब्बल 374 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडमधील धरणाच्या पाणीसाठ्यात 12 तासांमध्ये थेट 10 टक्के वाढ झाली आहे.