मुंबई : महाराष्ट्र सरकारने मुंबई-पुणे प्रवास कमीत-कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम यावर्षीच्या अखेरपर्यंत सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे काम करणाऱ्या व्हर्जिन हायपरलूप वन (Virgin Hyperloop One) या अमेरिकन कंपनीचे भारताचे व्यवस्थापकीय संचालक हर्ज धालिवाल कन्स्ट्रक्शन वीकला याविषयी माहिती दिली.
Curious about our progress in India? Watch below to see how far we’ve come in just one year. Excited to continue working with our partners to make a hyperloop a reality in Maharashtra and beyond. pic.twitter.com/5vFk5a4NLG
— Virgin Hyperloop One (@HyperloopOne) February 20, 2019
मुंबई-पुणे हायपरलूप मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर साडेतीन तासांचा मुंबई-पुणे प्रवास फक्त 25 मिनिटात पूर्ण करता येईल. म्हणजे मुंबईवरुन पुण्याला किंवा पुण्यावरुन मुंबईला जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे तब्बल 3 तास वाचणार आहेत. पुणे आणि मुंबईमधील अंतर 150 किलोमीटर आहे. या प्रस्तावित प्रकल्पाचा फायदा जवळपास 2 कोटी 60 लाख नागरिकांना होईल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.
पुणे आणि नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळही जोडले जाणार
मुंबई-पुणे हायपरलूप मार्गामुळे पुणे आणि नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळही जोडले जाणार आहे. या मार्गाच्या पहिल्या टप्प्यात केवळ 11.8 किलोमीटरचा ‘डेमॉन्स्ट्रेशन ट्रॅक’ असणार आहे. त्याचे काम 2023 पर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे. याच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी व्हर्जिन हायपरलूप वन कंपनी 500 मिलियन डॉलरची खासगी गुंतवणूक करणार आहे.
पहिल्या टप्प्यातील कामात जमीन अधिग्रहणासाठी कोणतेही अडथळे नसल्याने या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास कोणताही विलंब होणार नाही. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील काम सुरु करण्यात येईल. यात मुंबई ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि नवी मुंबई अशा मार्गांच्या कामाचा समावेश असेल.
वाहतुकीसाठी चुंबकीय क्षेत्र आणि हायपरलूप वाहनाचा उपयोग
मुंबई-पुणे हायपरलूप मार्ग मुंबई-पुणे महामार्गावरुनच समांतर जाईल. हायपरलुप वाहतूक सध्याची आधुनिक प्रकारातील वाहतूक मानली जाते. याद्वारे कमीत कमी वेळात प्रवाशांना एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी पोहचता येते. ही वाहतूक विशेष अशा हायपरलुप वाहनातून कमी दाबाच्या ट्युबमध्ये वीजेच्या वेगाप्रमाणे होते. हे वाहन चुंबकीय क्षेत्राचा उपयोग करुन ट्रॅकच्या वर तरंगत प्रवास करते.
When hours become minutes, everything changes. pic.twitter.com/Il4a9CoClU
— Virgin Hyperloop One (@HyperloopOne) May 21, 2019
प्रत्येकवर्षी 20 कोटींपर्यंत प्रवाशी मुंबई-पुणे प्रवास करतील, असा अंदाज आहे. ही गरज लक्षात घेऊन इतरही काही प्रकल्प सुरु करण्याचा विचार होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या नव्या वाहतूक मार्गाची सार्वजनिक वापरासाठीची व्यवहार्यता आणि सुरक्षितता राज्य सरकारला पटवून देण्यासाठी हा पहिला प्रकल्प ही कंपनी करत आहे.