मुंबई : पावसाने गेल्या पाच दिवसांपासून मुंबईत हाहा:कार माजवला आहे. पावसामुळे रस्ते, रेल्वे, हवाई वाहतुकीवर परिणाम झाला. मुंबईत अनेक ठिकाणी कमरेपर्यंत पाणी साचलं. तर उपनगरातील वसई, विरार नालासोपारा पूर्णत: पाण्यात आहे. मालाडमध्ये रात्री भिंत कोसळून आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 75 जण जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. मुंबईत आज दिवसभरात अनेक मृत्यू झालेच शिवाय राज्यभरातही पावसामुळे अनेकांचे जीव गेले.
आज किती जणांचा मृत्यू?
मालाडमध्ये भिंत कोसळून 21 जणांचा मृत्यू
कल्याणमध्ये नॅशनल उर्दू शाळेची सरंक्षण भिंत कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. करीमा मोहम्मद चांद, त्यांचा 3 वर्षांचा मुलगा हुसेन चांद आणि शोभा कांबळे यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. शोभा यांची नात आरती कर्डीले ही जखमी आहे. करीमा ही गर्भवती होती, ती एका पायाने अपंग होती. तिचा पती मजुरीचे काम करतो. शोभा ही सुद्धा घरकाम करून आपला उदरनिर्वाह करत होती.
मालाड सब वेमध्ये पाण्यात अडकलेल्या स्कॉर्पिओमधील दोघांचा दुदैर्वी मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे गाडीच्या काचा फोडून तब्बल 6 तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले.
मिरा रोड:- स्पाईस अॅण्ड राईस हॉटेलमध्ये शॉक लागून दोन कामगारांचा मृत्यू झाला. मिरा रोडच्या प्लेजंट पार्कमधील घटना. वीरेंद्र भुईया आणि राजन दास अशी मृतांची नावं. रात्री जवळपास दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे हॉटेल आणि रोडवर पाणी साचलं होतं. पाण्यामुळे फ्रीज मध्ये शॉक उतरला होता आणि फ्रीज मध्ये उतरलेल्या शॉकमुळे दोघांचा मृत्यू झाला.
पुण्यात भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू
पुण्यातील कात्रज भागात सिंहगड शिक्षण संस्थेची भिंत कोसळून 6 मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. आंबेगावातील सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरात रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
नाशिकमध्ये तिघांचा मृत्यू
मुंबई पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही बिल्डरचा निष्काळजीपणा समोर आला आहे. सातपूर परिसरात सम्राट ग्रुपच्या अपना घर या प्रोजेक्टमध्ये निकृष्ठ बांधकामाने तीन कामगारांचा बळी घेतला. पाण्याची टाकी कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी संबंधित बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.