भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची काल भेट झाली. लोकसभा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदा मुंडे यांची आठवले यांच्यासोबत भेट झाली आहे. आरपीआयच्या कार्यालयात ही भेट झाली आहे. या भेटीनंतर रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीवर रामदास आठवले यांनी भाष्य केलं. पंकजा यांना रिपाइं पाठिंबा देणार की नाही? हे आठवलेंनी स्पष्ट केलं. तसंच लोकसभा निवडणुकीवर रामदास आठवले यांनी भाष्य केलं.
माझी सीट 2026 मध्ये घोषित होणार आहे. दक्षिण भारतात भाजपची ताकद कमी आहे.त्यामुळे आम्ही तिकडे आमचे उमेदवार देणार आहोत. त्यात आसाम मध्ये 5, तेलंगणा मध्ये 2 तर आंध्रमध्ये 1 सीट उभी करतो, मणिपूरमध्ये 1 सीट, झारखंड मध्ये 1-2 लोकसभा लढणार आहोत, असं रामदास आठवले म्हणालेत. ओरिसामध्ये 8-9 विधानसभेच्या जागा लढणार आहोत. त्या जारा आम्ही जिंकू सुद्धा… बाकी ठिकाणी आमचा NDA ला पाठिंबा देणार आहोत. महाराष्ट्रात आता मविआ कमजोर झाली. त्यांच्या उमेदवारांमध्ये ताकद दिसत नाही. म्हणून आमचा नारा आता 48 चा आहे, असं आठवले म्हणाले.
पंकजाताई मला भेटायला आल्या होत्या. तुमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा हवा आहे, असं त्या म्हणाल्या. तुमच्या कार्यकर्त्यांना तश्या सूचना द्या असं सांगितलं. त्यांच्या वडिलांचे आणि आमचे चांगले संबंध होते. पंकजाताईंना तिकीट मिळल्यामुळे त्या खुश आहेत. तुम्ही दिल्लीत आल पाहिजे, अशी भूमिका मी मांडली होती. पंकजाताई यांचं बीड जिल्ह्यात चांगलं काम आहे. त्या खासदार म्हणून नक्कीच निवडून येतील. त्यांना आम्ही मागणी केली बीडमध्ये केज मतदारसंघ आहे, त्याचा रिपाइंला द्यावा. त्यांना आमचा पाठिंबा निश्चितपणे राहील. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं रामदास आठवले म्हणाले.
पंकजा मुंडे यांनी रामदास आठवले यांच्यासोबतच्या भेटीवर भाष्य केलं आहे. आठवलेजी आणि आमचे पारिवारिक संबंध आहेत. या नात्यानेच वहिनी आणि आठवले साहेबांची भेट घेतली. निवडणुकीला सामोरे जाताना आठवले साहेबांचे आशीर्वाद घेते. उमेदवारी अर्ज फाईल करण्याअगोदर त्यांना भेटले आहे. मला विश्वास आहे की ते आम्हाला साथ देतील. महायुतीच्या नेत्यांच्या पाठिंब्याने आम्ही जरूर ही निवडणूक जिंकू, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.