शिंदे गटाने रवींद्र वायकर यांना मुंबई उत्तर पश्चिममधून उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात वायकर यांचा सामना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याशी होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत होणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. निवडणुकीचं तिकीट मिळताच रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. मला लोकसभेची उमेदवारी मिळाली याचा आनंद आहे. मी माझ्या वरिष्ठांचे आभार मानतो, असं रवींद्र वायकर यांनी म्हटलं आहे.
रवींद्र वायकर यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी लोकप्रतिनिधी म्हणून जे काम केले आहे, त्याबद्दल मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मी मागच्या बेंचवर बसणारा नाही तर सर्वात पुढे होऊन प्रश्न मांडणारा आहे. मी लोकसभेत देशाचे प्रश्न तर मांडणार तर आहेच पण माझ्या मुंबईचे सर्वाधिक प्रश्न मांडणार आहे. मला बोलता येते. मला प्रश्नांची जाणीव आहे. एकादा प्रश्न विचारणे आणि त्याचे अचूक उत्तर घेणे हे माझ्या जवळ आहे. त्याप्रमाणेच मी काम करणार आहे, असं रवींद्र वायकर म्हणाले.
मी जी कामं केली आहेत. त्यामुळे वायकर हा एक ब्रँड झाला आहे. केवळ ती कामे पाहूनच मला उमेदवारी मिळाली आहे. मी कधीच जाती आणि धर्माचा विचार केला नाही. मी काम करणारा आहे. निवडणुकीत उभा राहताना आपल्या समोर समोरच्याचे आव्हान असतेच. पण मी प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहे. या निवडणुकीत मी कुणालाही वाईट म्हणणार नाही. तर मी काय करू शकतो त्यावर मतं मागणार आहे. मी जिंकूनच येणार आहे, असा दावाही वायकर यांनी केला.
राजकारणात अनेक आरोप होतात, बऱ्याच वेळा मुद्दाम आरोप केले जातात. पण तुम्ही जर चांगले काम केले तर कुठलाही आरोप तुम्हाला शिवू शकत नाही. माझ्यावर जे आरोप केले होते, त्यावर मी सुप्रीम कोर्टात गेलो होतो. कोर्टाने मला क्लिनचीट दिली आहे, असंही त्यांनी सांगितलं.