अशोक चव्हाणांच्या भाजपप्रवेशावर संजय राऊतांचा प्रहार; म्हणाले, ही तर शहिदांच्या अपमानाची…

| Updated on: Feb 14, 2024 | 10:26 AM

Saamana Editorial on Ashok Chavan Ineter in BJP : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हणांनी काल भाजप पक्षात प्रवेश केला. इतकी वर्षे काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर त्यांनी पक्षांतर केलं. त्यांच्या भाजपप्रवेशावर संजय राऊतांचा प्रहार; म्हणाले, ही तर शहिदांच्या अपमानाची...

अशोक चव्हाणांच्या भाजपप्रवेशावर संजय राऊतांचा प्रहार; म्हणाले, ही तर शहिदांच्या अपमानाची...
Follow us on

मुंबई | 14 फेब्रुवारी 2024 : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल दुपारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या पक्षांतरावर संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. महायुतीकडून त्यांचं स्वागत केलं जातंय. तस महाविकास आघाडीकडून अशोक चव्हाण यांच्या निर्णयावर टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून अशोक चव्हाणांच्या पक्षांतरावर टीका केली आहे. मोदीकृत! शहिदांच्या अपमानाची गॅरंटी! जय हिंद! या शीर्षकाखाली आजचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. याआधी भाजपने अशोक चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेचं उदाहरण संजय राऊतांनी दिलं आहे.

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा

‘आदर्श’मध्ये शहिदांचा अपमान झाला म्हणून काँगेसच्या चव्हाणांना घरी पाठवा, आम्ही त्यांना तुरुंगात पाठवू, अशी ‘गॅरंटी’ मोदी यांनी नांदेडला येऊन दिली होती. अशोक चव्हाण हे लीडर नसून डीलर आहेत, असे देवेंद्र फडणवीस गळ्याच्या नसा फाडून बोंबलत होते.

आज त्याच डीलरच्या, शहिदांचा अपमान करणाऱ्यांच्या स्वागताच्या कमानीवर पताका चिकटविण्याचे काम फडणवीस-मोदी यांना करावे लागत आहे. भाजपच्या मोठ्या पराभवाची ही गॅरंटी आहे! शहीद भाजपला माफ करणार नाहीत! भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा महाराष्ट्रातच नाही, तर असे वातावरण संपूर्ण देशातच तयार झाले आहे. ‘अब की बार चारसौ पार’ ही मोदी गर्जनाही याच मोहिमेचा एक भाग आहे. अर्थात, भारतीय जनता पक्षाची 400 जागांची दिल्ली अभी बहोत दूर है. इतर पक्षांतील शक्तिमान भ्रष्टाचाऱयांना घेऊनदेखील ते जेमतेम दोनशेचा आकडा पार करू शकतील, असे वातावरण आहे. याच घाबरलेल्या अवस्थेत भाजप रोज इतर पक्षांतील भ्रष्टाचाऱयांना आपल्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये टाकून स्वच्छ करीत आहे.

मुंबईतील कफ परेड या श्रीमंत भागात शहीद सैनिकांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर अशोक चव्हाण यांच्या प्रेरणेने एक उंच टॉवर उभा राहिला. मूळ इमारत पाच-सहा माळ्यांचीच होणार होती. त्यावर अशोक चव्हाण कृपेने 32 माळे उभे राहिले. कोट्यवधींचा व्यवहार त्यात झाला. हे सर्व प्रकरण ‘सीबीआय’कडे गेले. त्यात अनेक अधिकाऱ्यांना अटका झाल्या.

अनेक राजकारण्यांनी त्या इमारतीत गुंतवणूक केली. याच ‘आदर्श’ इमारतीत अशोक चव्हाण अॅण्ड फॅमिलीचे पाच-सहा फ्लॅट असल्याचे उघड झाले. भारतीय सैन्यातील शहिदांच्या विधवा पत्नींचे फ्लॅटस् हडपण्याचे हे प्रकरण तेव्हा भाजपने लावून धरले. अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. स्वतः पंतप्रधान मोदी हे तेव्हा नांदेडला आले होते आणि अशोक चव्हाण यांनी ‘आदर्श’ घोटाळ्यात शहिदांचा अपमान केला, असे भावपूर्ण शब्दांत सांगितले होते.

‘आदर्श’ घोटाळ्यात जो शहिदांचा अपमान झाला त्याचे काय? मग ज्या शहिदांसाठी भाजपने अपमान झाल्याची बोंब ठोकली ती खोटी होती? की शहिदांनाच भाजपने आपल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून त्यांच्यावरील हौतात्म्याचे रंग पुसून टाकले? ते शहीद नव्हतेच असे आता भाजप जाहीर करणार असेल तर प्रश्नच संपला.