मुंबई | 12 मार्च 2024 : सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशातच या निवडणुकीमध्ये बहुमत मिळाल्यास भाजपला संविधान बदलायचं आहे, असा आरोप विरोधक करतात. काल माध्यमांशी बोलताना भाजपला घटना बदलायची आहे, असा उल्लेख केला. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटातूनही याच मुद्द्यावर भाष्य केलं आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून याच मुद्द्यावर भाष्य करण्यात आलं आहे. ‘संविधानाच्या हत्येची तयारी’ शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. भाजपचा ‘चारशे पार’चा नारा ही संविधानाच्या हत्येची तयारी आहे, असं म्हणत सामनातून संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र डागलंय.
2024 ची सार्वत्रिक निवडणूक ही शेवटची निवडणूक ठरेल, ही भीती भाजप खासदार अनंत हेगडे यांनी खरी ठरवली आहे. देशाचे सध्याचे संविधान नष्ट करून मोदी युगात नवे संविधान लिहिले जावे, असे मोदींच्या अवतीभवतीचे खास लोक बोलत असतात.
लोकशाहीचा गाभा, लोकशाहीचा आधार, लोकशाहीचा बुरुज, लोकशाहीची तटबंदी, लोकशाहीची ढाल-तलवार म्हणजेच भारताचे संविधान. त्या संविधानाचा खून करण्याची तयारी सुरू आहे व त्यासाठी 400 मारेकरी तयार केले जात आहेत. भाजपचा ‘चारशे पार’चा नारा ही संविधानाच्या हत्येची तयारी आहे.
2024 च्या निवडणुकीत ‘भाजप चारशे पार’चा उद्घोष पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. भारताच्या संविधानाने अशी घोषणा करण्याची व लोकशाही मार्गाने चारशे जागा जिंकण्याची मुभा मोदी यांना दिली आहे. मोदी यांना चारशेचे बहुमत देश घडविण्यासाठी, विकास करण्यासाठी, जनकल्याणासाठी हवे असे वाटले होते, पण भाजप खासदार अनंत हेगडे यांनी ‘चारशे पार’चे मनसुबे उघड केले आहेत.
भाजपला चारशे पारचे बहुमत यासाठी हवे आहे की, त्या पाशवी आकड्याच्या बळावर भाजपास देशाचे पवित्र संविधान बदलायचे आहे. हे वक्तव्य गंभीर आहे. भारतीय जनता पक्षाच्या मनात संविधान बदलायचे असेल तर त्यामागची प्रेरणा काय आहे? जगातील अनेक देशांत संविधान संपवून हुकूमशाही सुरू झाली. मुसोलिनी, हिटलर, रुमानियाचे राज्यकर्ते, युगांडाचा इदी अमिन, लिबियाचा गद्दाफी यांनी संविधान न मानता स्वतःची हुकूमशाही प्रस्थापित केली.
रशियाचे तहहयात अध्यक्ष पुतीन यांनीही त्यांच्या देशाचे संविधान आपल्या मनाप्रमाणे बदलून घेतले. संविधानात बदल करून पुतीन यांनी स्वतःला आजन्म अध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा केला. म्हणजे रशियात निवडणुका वगैरे व्यवस्था मोडीत निघाली. पुतीन हाच कायदा व पुतीन हेच संविधान. भारताचे संविधान बदलून भाजपला पुतीन यांच्याप्रमाणे मोदी यांना भारताचे बादशहा म्हणून नेमणूक करायची आहे काय? म्हणजे मोदी हेच मोदी यांचे कायम उत्तराधिकारी राहतील.