मुंबई | 24 ऑक्टोबर 2023 : आज दसरा आहे. दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. शिंदे गटाने बंड केल्यानंतरचा हा दुसरा दसरा मेळावा आहे. आज संध्याकाळी दादरच्या शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडेल. तर मुंबईतील आझाद मैदानावर शिंदेगटाचा मेळावा पार पडेल. या दसरा मेळाव्या आधी आजच्या सामनातून संजय राऊत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. अहंकाराचा नाश होईल!, शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यातून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.
दसरा हा मंगलमय सण, पण महाराष्ट्राचे अमंगल करणारे एक बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकार शिवरायांच्या महाराष्ट्रावर मोदी-शहांनी लादले आहे. सत्तेचा माज व अहंकार अशाच पद्धतीने रावणाच्या नसानसांत उसळत होता. त्याअहंकाराचा नाश शेवटी दसऱ्याच्या दिवशी झाला . तेव्हापासून विजयादशमीचा उत्सव साजरा होत आहे . घटनाबाहय़ , अहंकारी रावणाचा नाश होईल या जिद्दीने मराठी जनतेची मने व मनगटे तापली आहेत . शिवतीर्थावर ‘ राम – लीला ‘ साजरी होईल . अहंकारी रावणाचे दहन होईल , महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होईल व भारत देश सूडाच्या फासातून मुक्त होईल . महाराष्ट्राच्या जनतेने अहंकाराचा कोथळा काढण्यासाठी ‘ वाघनखे ‘ चढवली आहेत . आजच्या दसऱ्याचे हेच महत्त्व आहे . विजयादशमीच्या लाख लाख शुभेच्छा!
‘दसरा सण मोठा’ असे गर्वाने म्हटले जाते तो दसरा आज साजरा होत आहे. श्रीरामाने रावणावर विजय मिळवला तोच हा दिवस. भगवान रामाने रावणाचा वध करण्यासाठी चंडी देवीची पूजा केली. ती चंडी म्हणजे दुर्गा. रामाने युद्ध जिंकले म्हणजेच रावणाच्या अहंकाराचा नाश केला, त्याचा अभिमान मोडला. रावणाकडे सोन्याच्या विटा म्हणजे सोन्याचे खोके होते. ते खोकेही त्याला वाचवू शकले नाहीत हेच खरे दसऱ्याचे महत्त्व आहे.
महाराष्ट्राचे पुरोगामित्व, एकजिनसीपणा यामुळे संपला. महाराष्ट्राची एकजूट तोडण्याचे काम 2014 पासून सुरू झाले. त्याच कारस्थानाचा भाग म्हणून शिवसेना तोडली गेली, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फोडला गेला व मिंध्या-लाचार बुळचटांच्या हाती महाराष्ट्र सोपवून भाजपने नवी फडणविशी सुरू केली. महाराष्ट्राचे शौर्य, मर्दानगी, स्वाभिमान मारून शिवरायांच्या महाराष्ट्रास ‘लाचार’ बनवायचे हे धोरण अमलात आणले आहे. आता म्हणे, छत्रपती शिवरायांची ‘वाघनखे’ तीन वर्षांच्या कंत्राटावर, भाडेतत्त्वावर इंग्लंड येथून आणली जात आहेत. इतिहासकार व शिवरायांच्या वंशजांच्या मनात या ‘वाघनखां’विषयी शंका आहेत, पण काही कोटी रुपये जनतेच्या तिजोरीतून खर्च करून ही वाघनखे आणली जात आहेत.
रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अशी शिवरायांची आज्ञा होती, पण येथे वाघनखांवर शिवरायांच्या नावाने कोटय़वधी रुपये लंडनमधील एका म्युझियमला दिले. शिवरायांच्या नावाने केलेला हा घोटाळा आहे. महाराष्ट्रात फसवाफसवी आणि राजकीय दरोडेखोरीचे प्रकार राजरोस सुरू आहेत.