मुंबई | 11 फेब्रुवारी 2024 : मागच्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत शिंदे सरकारवर गंभीर आरोप करत आहेत. गुंडांसोबतचे फोटो शेअर करत संजय राऊत शिंदे पिता-पुत्रावर गंभीर आरोप करत आहेत. सात गुंडांचे मुख्यमंत्री शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यासोबतचे फोटो शेअर करत राऊतांनी टीका केली आहे. आता आजच्या सामनाच्या अग्रलेखातूनही शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यात झालेल्या गोळीबार प्रकरणावर सामनाच्या ‘रोखठोक’ सदरातून भाष्य करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात गुंडांचे राज्य! कोण चालवीत आहे? या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राऊतांनी सवाल केलाय.
पंतप्रधान मोदी नैतिकतेच्या गप्पा मारतात, पण महाराष्ट्रासारख्या राज्यात त्यांच्या आशीर्वादाने गुंडांचे राज्य सुरू आहे. त्यावर भाजपवाले गप्प आहेत. महाराष्ट्रातील कंत्राटदार, व्यापारी, दुकानदार सरकारी गुंडांना खंडणी देऊन थकले आहेत. मंत्रालयात व मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गुंड टोळय़ांबरोबर बैठका होतात. हे गंभीर वाटत नाही काय?
पंतप्रधान मोदी यांनी केदारनाथच्या गुहेत जाऊन तपश्चर्या व आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. मोदी खोटे बोलतात व त्या खोटेपणाची ‘री त्यांचे लोक ओढतात. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदी साधारण तासभर बोलले. ते विषय सोडून बोलले. त्यातील 80 मिनिटे ते काँग्रेसवरच बोलत राहिले. पंडित नेहरूनी देशाला आळशी बनवले, असे एक विधान त्यांनी भाषणात केले. इंदिरा गांधींवरही ते बोलले. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला आपला देश मेहनतीने उभा करायचा हा संदेश नेहरूंचाच होता. मोदी याच्या मते, नेहरूनी देशवासीयांना आळशी बनवले. नेहरूना असे बोलणे हा समस्त कष्टकरी देशवासीयाचा अपमान आहे.
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांचा वाढदिवस म्हणे 4 फेब्रुवारी रोजी झाला. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गुंडांची मांदियाळीच जमली. शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज गुंडांनी लावले. त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. गुंडगिरीचे इतके उघड समर्थन व उदात्तीकरण महाराष्ट्रात याआधी कधीच झाले नव्हते. शिंदे गटात प्रवेश करणारया गुंडांना लगेच पोलीस संरक्षण देऊन सन्मान केला जातो, हे अत्यंत गंभीर चित्र आहे. ज्या गुडाची मुंबई-पुणे-ठाण्यात पोलिसांनी धिंड काढली, त्याच गुंडांच्या संरक्षणासाठी शिंदे यांनी आज पोलीस लावले.
अजित पवार याचे चिरंजीव पार्थ पवारही त्याकामी मागे नाहीत. तेही गुंडांच्या भेटीला पुष्पगुच्छ घेऊन जातात व श्री. अजित पवार ‘मोदींकडे आपली वट आहे,’ अशी भाषणे करतात. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर अनेक गुंडाचे फोटो प्रसिद्ध झाले. पंतप्रधान मोदी यांच्याकडे ‘संघ’ परिवाराने ते फोटो पाठवायला हवेत. त्याचा उपयोग होणार नाही. तरीही महाराष्ट्रात त्यांनी काय कचरा उधळला आहे ते त्यांना कळू द्या, चोरया, लुटमार, दहशत व हत्या हेच महाराष्ट्राचे प्राक्तन बनले आहे.