मुंबई | 19 मार्च 2024 : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप झाला. दादरच्या शिवाजी पार्कवर सांगता सभा पार पडली. या सभेला देशभरातील इंडिया आघाडीचे नेते आले होते. या सभेला इंडिया आघाडीचा घटकपक्ष शिवसेनाही या सभेला हजर राहिला. यावर भाजपकडून जोरदार टीका केली गेली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही शिवसेना ठाकरे गटावर जोरदार टीका केली. त्या टीकेला आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आजच्या सामनातून संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे. ‘भाजपचा लंगोट सुटला!’ या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मणिपुरातून सुरू झाली ती मुंबईत पोहोचली. मुंबईने राहुल गांधींचे स्वागत केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही तेव्हा इंदिरा गांधी यांचे स्वागतच केले होते, पण तेव्हा भाजप व बावनकुळ्यांचा जन्म व्हायचा होता.
राहुल गांधी यांनी देशातले वातावरण नक्कीच जिवंत केले आहे. मुंबईत त्यांनी बहार आणली. इंडिया आघाडीने मुंबईत युद्धाचा शंख फुंकला. भाजपने काँग्रेसचाच लंगोट बांधला असल्याने शंख फुंकताच त्यांचा लंगोट सुटला. त्याचे आता काय करायचे? दिवा विझता विझता मोठा होतो तसे भाजपचे झाले आहे. भाजपने स्वतःच्या काँग्रेजी लंगोटाची काळजी घ्यावी. नसत्या उठाठेवी करू नयेत.
भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतील धारावीत झाला. त्या निमित्ताने राहुल गांधींचे मुंबईत मोठे शक्ती प्रदर्शन झाले. त्या शक्ती प्रदर्शनाने भाजप व त्यांच्या गुलाम गटांची बुबुळे बाहेर आली. रविवारी शिवतीर्थावर ‘इंडिया’ आघाडीची विराट सभाही पार पडल्याने लोकसभा प्रचाराचे रणशिंग मुंबईतच फुंकले गेले. सभेत देशभरातील प्रमुख नेते उपस्थित राहिले. देशातील परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून व खासकरून मुंबईतून झाली हे महत्त्वाचे. मुंबईतून 1942 साली ब्रिटिशांना ‘चले जाव’चा इशारा दिला होता. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गवालिया टँक मैदानात लाखांच्या संख्येने जनसमुदाय जमला होता व स्वातंत्र्यापूर्वीच्या शेवटच्या सर्वात मोठय़ा लढय़ाची म्हणजे ‘चले जाव’ची घोषणा तेथे झाली.
रविवारी शिवतीर्थावरून साधारण त्याच प्रकारची गर्जना झाली. ब्रिटिश राजवटीपेक्षाही भयंकर हुकूमशाही देशातील मोदी राजवटीत सुरू आहे व त्यांना ‘चले जाव’चा इशारा देणारी सभा मुंबईत पार पडली. याच सभेत ‘अबकी बार, भाजप तडीपार’ अशी बुलंद हाक देण्यात आली. ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी या वेळी जोरदार भाषणे केली. जनतेतही या सभेने ऊर्जेचा संचार झाला. त्याचा परिणाम असा झाला की, मोदी म्हणतात, या वेळी 370 जिंकू, पण अमित शहांनी आता सांगितले 300 जिंकू. म्हणजे मुंबईतील एका सभेनेच हुकूमशहांच्या 70 जागा कमी केल्या. जसजसे ‘इंडिया’चे वादळ घोंघावत जाईल तसे तसे भाजपचे आकडे घसरत जातील.
श्री. राहुल गांधी म्हणजेच काँग्रेससोबत शिवतीर्थावर झालेल्या सभेच्या’न्याय मंचा’वर उद्धव ठाकरे उपस्थित राहिले म्हणून भाजप व त्यांच्या गुलाम गटांत पोटाचे विकार सुरू झाले. ठाकरे यांना काँग्रेसबरोबर मंचावर जाणे वगैरे शोभते काय? अशी बकवास त्यांनी केली. ज्या भाजपने स्वतःची चड्डी सोडून काँग्रेसचे लंगोट बांधले आहे त्यांनी शिवसेना काँग्रेसच्या मंचावर गेली याबद्दल दुःख व्यक्त करावे हे आक्रित आहे. मुळात भाजपने स्वतःची ‘काँग्रेस’ करून घेतली आहे. भाजपने स्वतःचा चेहरा व अस्तित्व गमावले आहे.